काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला जॉली एलएलबी २ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्या चित्रपटाच्या अखेरीस साधू्च्या वेशात लपून बसलेल्या दहशतवाद्याला पोलीस पकडून कोर्टात घेऊन येतात आणि संपूर्ण कथानकालाच कलाटणी मिळते असे दाखवण्यात आले होते. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये एक बांगलादेशी गुन्हेगार साधूचा वेश घेऊन सुमारे ३० वर्षे लपून होता अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मोहम्मद हाशिम मलिक असं त्याचं नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात बांगलादेशमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद हाशिम याचं वय ६० वर्षे असून, त्याला हाशिम मलिक या नावानेही ओळखलं जात असे. त्याने बांगलादेशमध्ये अनेक गुन्हे केले होते. आता पश्चिम बंगालमधील स्पेशल टास्क फोर्सचे सब इन्स्पेक्टर मोहम्मद अब्दुल नूर चौधरी यांच्या तक्रारीच्या आधारावर मोहम्मद हाशिम याला अटक करण्यात आली आहे. आरोपी मोहम्मद हाशिम याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
प्राथमिक तपासामध्ये मोहम्मद हाशिम याने आपण बांगलादेशमध्ये अनेक गुन्हे केल्याचे मान्य केले आहे. तसेच शिक्षेपासून वाचण्यासाठी आपण सीमापार करून भारतात आल्याची कबुली दिली आहे.