शनिवारी दुपारी बेंगळुरूहून १६० प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पहिल्या प्रयत्नात ग्वाल्हेर विमानतळावर यशस्वीरित्या उतरू शकले नाही. परंतु, दुसऱ्या प्रयत्नात ते सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्यात आले. पहिले लँडिंग न झाल्याने विमानाने आकाशात आणखी एक फेरी मारली आणि नंतर सुरक्षितपणे जमिनीवर उतरले. या दरम्यान कोणताही अपघात झाला नाही, असे एअरलाइनने सांगितले. मात्र यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्वाल्हेर विमानतळाचे संचालक ए.के. गोस्वामी म्हणाले की, विमानाने नंतर बंगळुरूसाठी उड्डाण देखील केले आणि ते सुरक्षितपणे उतरले. पहिल्या प्रयत्नात उतरण्यात अपयशी ठरल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीती निर्माण झाली होती.
त्यांनी सांगितले की, तांत्रिक कर्मचाऱ्यांनी लँडिंगनंतर विमानाची तपासणी केली आणि त्यांना त्यात कोणताही दोष आढळला नाही. गोस्वामी म्हणाले की, पहिल्या प्रयत्नात लँडिंग न होणे ही एक सामान्य घटना आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, काही प्रवाशांनी विमानातून उतरल्यानंतर विमानतळ आणि विमान कंपन्यांकडे तक्रारी केल्या.
ग्वाल्हेरमध्ये सुरक्षित लँडिंगएअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या एका विमानाने अचानक उड्डाण केले आणि नंतर ते ग्वाल्हेरमध्ये सुरक्षितपणे उतरले आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निवेदनात म्हटले आहे की, गरज पडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून विमानातील कर्मचाऱ्यांना लँडिंग न झाल्यास पुन्हा उड्डाण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असते. विमान कंपनीने म्हटले की, विमानाने दोनदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि ते सुरक्षितपणे उतरले.