मोदींपाठोपाठ ‘अमूल’ही वाराणशीत !
By Admin | Updated: May 16, 2014 04:56 IST2014-05-16T04:56:44+5:302014-05-16T04:56:44+5:30
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ गुजरातमधील ‘अमूल’ हा दुधाचा प्रसिद्ध ब्रँडही वाराणशीत दाखल होत आहे.

मोदींपाठोपाठ ‘अमूल’ही वाराणशीत !
बडोदा : भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ गुजरातमधील ‘अमूल’ हा दुधाचा प्रसिद्ध ब्रँडही वाराणशीत दाखल होत आहे. वाराणशीत ‘अमूल’ २०० कोटींचा डेअरी प्रोसेसिंग प्रकल्प उभारणार असून दररोज तब्बल पाच लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प सुरू होत आहे. गुजरातमधील पालनपूर येथील बानस डेअरीद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. बानस डेअरी गुजरात को-आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनची सदस्य आहे. बानस डेअरीद्वारे अमूलच्या उत्पादनांची विक्रीही केली जाते. उत्तर प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाशी यासंदर्भात चर्चा झाली असून, वाराणशी विमानतळाजवळ भूखंड खरेदी करण्यात आल्याचे बानस डेअरीचे अध्यक्ष पार्थी भाटोल यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने ‘अमूल’ला ३० एकर जमीन उपलब्ध करून दिली असून, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यासाठी सहकार्य केल्याचेही भाटोल यांनी सांगितले. वाराणशीप्रमाणेच कानपूर आणि लखनौतही जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून तेथेही लवकरच ‘अमूल’चा प्रकल्प सुरू होणार आहे. कानपूरमध्ये ४० तर लखनौत २० एकर भूखंड ‘अमूल’ने खरेदी केला आहे. या दोन्ही प्रकल्पांचीही क्षमता प्रत्येकी पाच लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. वाराणशीत सुरुवातीला दूध, दही आणि ताक याचे पॅकिंग केले जाईल. टप्प्याटप्प्याने इतर उत्पादनांची विक्री केली जाईल, असे भाटोल म्हणाले. (वृत्तसंस्था)