दिल्लीतील पराभवामुळे अमित शहांच्या मुलाचे लग्न साधेपणाने
By Admin | Updated: February 11, 2015 10:18 IST2015-02-11T10:18:09+5:302015-02-11T10:18:09+5:30
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लाजीरवाण्याचा पराभवाचा फटका भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला बसला.

दिल्लीतील पराभवामुळे अमित शहांच्या मुलाचे लग्न साधेपणाने
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ११ - दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लाजीरवाण्याचा पराभवाचा फटका भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला बसला. मंगळवारी दिल्लीतील निकालाच्या दिवशीच अहमदाबादमध्ये अमित शहांच्या मुलाचे लग्न होते. या लग्नासाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र पराभवामुळे हा विवाहसोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. पराभवामुळे मुलाची वरातही काढण्यात आली नाही व लग्नाच्या ठिकाणी संगीतही बंद करण्यात आले होते.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय याचा रिषिता या तरुणीसोबत मंगळवारी विवाह झाला. अहमदाबादमधील वायएमसीए संकुलात हा विवाह सोहळा पार पडला. मुलाच्या विवाहामुळे आनंदात असलेल्या शहा कुटुंबाच्या उत्साहावर दिल्लीतील पराभवाने अक्षरशः पाणी फेरले.
अमित शहा यांच्या मुलाच्या लग्नासाठी दक्षिण भारतातून २२ ब्राह्मणांना बोलवण्यात आले होते. याशिवाय वधू व वर मांडवात प्रवेश करतील त्यावेळी संगीतही वाजवले जाणार होते. मांडवात येण्यापूर्वी जयची घोड्यावरुन वरातही काढली जाणार होती. मात्र मंगळवारी सूर्य अस्ताला जात असतानाच दिल्लीत भाजपावर लाजीरवाण्या पराभवाची नामूष्की ओढावल्याचे स्पष्ट झाले अन् विवाह सोहळ्यातील चित्रच बदलले. वरात रद्द करण्यात आली, वरातीसाठी बोलवलेला बॅंडबाजाही परत पाठवण्यात आला. विवाहाच्या ठिकाणी संगीतही बंद ठेवण्यात आले. संपूर्ण विवाह सोहळ्यात अमित शहा यांनी मौन बाळगणे पसंत केले. नातेवाईकांशी ते बोलत होते मात्र चर्चेत दिल्ली विधानसभा निवडणुकीवर भाष्य करणे त्यांनी टाळले. या विवाह सोहळ्याला राजनाथ सिंह, अरुण जेटली, राजीव प्रताप रुडी, लालकृष्ण आडवाणी, बाबा रामदेव व काही ख्यातनाम उद्योजक उपस्थित होते. दिल्लीतील अंतिम निकाल हाती येताच अमित शहा यांनी संकुलातील बंद कम-यात राजनाथ सिंह, अरुण जेटली व राजीवप्रताप रुडी या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पराभवावर आणि आता काय पावले उचलावीत यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या विवाह सोहळ्याला अनुपस्थित राहणेच पसंत केले.