अमित शहा मुस्लिम शिक्षकाकडून शिकणार 'योगासने'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2015 16:42 IST2015-06-17T16:04:02+5:302015-06-17T16:42:05+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या योग शिबीरात भाजपाध्यक्ष अमित शहा मुस्लिम शिक्षकाकडून योग शिकणार आहेत.

अमित शहा मुस्लिम शिक्षकाकडून शिकणार 'योगासने'
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा येत्या २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योगदिनी' पाटणा येथे मुस्लिम योग शिक्षकाकडून योगासने शिकणार आहेत. योगतज्ज्ञ मोहम्मद तमन्ना व अशोक सरकार दे दोघेही पाटण्यातील मोइनुल हक मैदानावर होणा-या शिबीरादरम्यान शहांना योगाच्या टिप्स देणार असल्याचे बिहार- झारखंड पतंजली योगपीठाचे प्रभारी अजीत कुमार यांनी स्पष्ट केले.
काही मुस्लिम संघटनांनी सूर्यनमस्कार व मंत्रोच्चारांबाबत हरकत घेत योगदिनाला आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर केंद्र सरकाने मुस्लिम समाजातील नागरिकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे योग करण्याची सूट दिली, मात्र तरीही काही संघटनांचा विरोध अद्याप कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मुस्लिम शिक्षकाकडून योग शिकणे सूचक मानले जात आहे.
शहा यांच्यांसह केंद्र सरकारमधील सुमारे अर्धा डझन मंत्रीही या शिबीरात सहभागी होणार असून त्यात रवीशंकर प्रसाद, राजीव प्रताप रूडी, राधा मोहन सिंग व राम कृपाल सिंग यांचा समावेश आहे.
दरम्यान या शिबीरातील शाह यांच्या उपस्थितीला राजकीय वळण मिळत असल्याचे दिसत आहे. यारून बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी भाजपावर निशाणा साधत योगदिनाच्या नावावर भाजपा ' केवळ ड्रामा' करत असल्याची टीका केली आहे. मोदी सरकारने योगाला प्रचार व देखाव्याचा मुद्दा केल्याचेही नितीश यांनी म्हटले. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी नीतिश कुमार यांना चोख प्रत्युत्तर देत मनाच्या शांततेसाठी त्यांना 'प्राणायाम' करण्याचा खोचक सल्ला दिला आहे.