भाजपाच्या अध्यक्षपदी अमित शहा?
By Admin | Updated: June 25, 2014 02:57 IST2014-06-25T02:57:49+5:302014-06-25T02:57:49+5:30
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तींचा शोध सुरू झाला असून, भाजपाच्या केंद्रीय संघटनेमध्ये मोठा फेरबदल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

भाजपाच्या अध्यक्षपदी अमित शहा?
>जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांना मोदी सरकारमध्ये गृहमंत्री बनविण्यात आल्याने भाजपाच्या अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तींचा शोध सुरू झाला असून, भाजपाच्या केंद्रीय संघटनेमध्ये मोठा फेरबदल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत मोदी यांचे विश्वासू आणि पक्षाचे सरचिटणीस अमित शहा तसेच मोदींचे निकटवर्तीय सरचिटणीस जगत प्रकाश नड्डा आणि ओम माथुर यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु सध्याच्या राजकीय स्थितीत अमित शहा यांचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्या दहा वर्षात उत्तर प्रदेशात केवळ दहा खासदार भाजपाकडे होते. परंतु 16 व्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 73 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. त्याचे श्रेय अमित शहा यांना दिले जात आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेल्या बडोदा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
सरकार आणि पार्टीप्रमुख असे दोन समांतर केंद्र विकसित होण्याला संघ मुख्यालयाने देखील विरोध केला आहे. त्यादृष्टीने विचार करता मोदींच्या कार्यशैलीची चांगली ओळख असलेले अमित शाह अध्यक्षपदासाठी योग्य मानले जात आहेत.
पंतप्रधान आणि पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष एकाच राज्यातून आलेला नसावा, असे संघाचे मत होते. परंतु मोदींचे दडपण आल्याने संघाने त्यांच्या सुरात सूर मिसळणो योग्य समजले आहे, असे सांगण्यात येते. मोदींच्या पसंतीच्या उमेदवाराला संघाकडून हिरवा कंदील मिळाला असल्याचे मानले जात आहे. मात्र, पार्टी आणि संघातील एक मोठा गट अध्यक्षांची निवड घाईगडबडीत करण्याच्या विरोधात आहे.
सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर केंद्रीय संघटनेत फेरबदल करण्यात यावे, असे त्यांचे म्हणणो आहे. पार्टीच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेने शिक्कामोर्तब केलेले नाही. राष्ट्रीय कार्यकारिणी आणि परिषदेची बैठक संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर बोलावली जाण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात हरलेल्या जागांवर भाजपाची नजर
4सपा नेते मुलायमसिंग यांचा आझमगडवरील प्रभाव कमी करण्याची जबाबदारी गोरखपूरचे पक्षाचे वरिष्ठ खासदार योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे रायबरेली आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अमेठीतील वर्चस्व संपवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र आणि फूलपूरचे खासदार केशव मौर्य यांच्याकडे देण्यात आली आहे. मैनपुरीच्या पोटनिवडणुकीसाठी पराभूत उमेदवारास पुन्हा सक्रिय केले जात आहे.