काश्मीरमध्ये पहलगामधील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जगभरात पडसाद उमटले. २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात आणि पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे पाणी रोखण्यात आले आहेत. इतरही निर्णय घेण्यात आले असून, आता भारतातील पाकिस्तानी नागरिकांबद्दल निर्णय घेण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधून परतताच शुक्रवारी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला.
पहलगाम हल्ल्याबद्दल माहिती देतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याचे निर्देश दिले. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांना तातडीने परत पाठवा, असे शाह यांनी सांगितले. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसाही रद्द करण्यात आले आहेत.
२२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यात सिंधू जल करार स्थगित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. भारत-पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू जल करार लागू करण्यात आला होता.
सिंधू नदीलाच पाकिस्तानची जीवनवाहिनी म्हटले जाते. २१ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला पाणी पुरवण्याचे काम सिंधू नदी आणि तिच्या चार उपनद्यांच्या माध्यमातून होते.