पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असतानाच इतके छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी १ हजारांहून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं असून, सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ५ नक्षलवादी मारले गेले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात करेगुट्टा डोंगरातील जंगलांमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांचं एक संयुक्त पथक नक्षल विरोधी अभियानावर निघालं होतं. त्याच दरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरदाखल कारवाईत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. सूत्रांनी पुढे सांगितले की, छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दलांनी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईत १ हजारांहून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. या मोहिमेमध्ये छत्तीसगड, तेलंगाणा आणि महाराष्ट्रातील एक हजारांहून अधिक जवानांचा समावेश आहे.
तत्पूर्वी सुरक्षा दलांच्या पथकाने आपल्या शोधमोहिमेमध्ये बिजापूरमधील जंगलात काँक्रिटच्या स्लॅबपासून तयार करण्यात आलेली एक बंकरसारखी खोली उद्ध्वस्त केली आहे. तसेच आणखी नक्षल्यांच्या १२ ठिकाणांना नष्ट करण्यात आलं आहे.