अमेरिकी माध्यमांनी मोदींवर फोडले पराभवाचे खापर
By Admin | Updated: November 9, 2015 23:01 IST2015-11-09T23:01:39+5:302015-11-09T23:01:39+5:30
बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय झटका असल्याचे विश्लेषण अमेरिकेतील मीडियाने केले आहे.

अमेरिकी माध्यमांनी मोदींवर फोडले पराभवाचे खापर
वॉशिंग्टन : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय झटका असल्याचे विश्लेषण अमेरिकेतील मीडियाने केले आहे. तथापि, भाजपच्या एक वर्षाच्या काळाचे हे नकारात्मक मूल्यांकन आहे, असेही राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.
मिशिगन विश्वविद्यालयातील प्रोफेसर पुनीत मनचंदा म्हणतात की, दिल्लीमधील आपचा विजय हा नेत्यांकडून मतदारांचा झालेला अपेक्षाभंग अधोरेखित करतो; परंतु बिहारमधील पराभव हा भाजपच्या एक वर्षाच्या काळातील नकारात्मक मूल्यांकन दर्शवितो. सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांवर चिंता व्यक्त केली जात आहे, असे वाटते. कारण, बिहारसारख्या राज्यात भाजपचा पराभव होणे हा पक्षासाठी मोठा सेटबॅक आहे.
कोण काय म्हणाले?
द वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे की, महत्त्वपूर्ण निवडणुकीत भारताच्या सत्तारूढ पार्टीने पराभव स्वीकारला.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव हा भाजपसाठी मोठा राजकीय झटका आहे. या निकालाने पक्षाला त्या महत्त्वपूर्ण स्थानापासून बाजूला केले आहे, जेथून हा पक्ष पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यात राजकीय वर्चस्व निर्माण करू इच्छित आहे.
- वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये म्हटले आहे की, भाजपला हा मोठा दणका आहे जो की, मोदींच्या आर्थिक विकासाच्या योजनांना ब्रेक लावू शकतो.
- नॅशनल पब्लिक रेडिओने म्हटले आहे की, हा पराभव मोदींना त्यांचा मार्ग बदलण्यासाठी प्रेरित करेल काय? कॅबिनेटमध्ये बदलांसह इतर बदल केले जातील का? हा मोठा प्रश्न आहे.
- इंडियन नॅशनल ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज अब्राहम म्हणतात की, बिहारमधील नागरिकांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, ते वाढती असहिष्णुता आणि भाजपकडून होणारे ध्रुवीकरण याला ठाम विरोध करतात.
......