बिहारमध्ये मतदार यादीवरून मोठा गोंधळ सुरु आहे. निवडणूक आयोग मतदारांकडून केवायसी करवून घेत आहे. एकीकडे महाराष्ट्रात बोगस मतदार वाढल्याचा आरोप करणारी काँग्रेस बिहारमध्ये मात्र निवडणूक आयोग मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणार असल्याचा ओरडा मारत सुटली आहे. अशातच बिहारच्या मधेपुरामधून एक आश्चर्यकारक बातमी येत आहे.
तेथील एका महिलेच्या मतदार ओळखपत्रावर तिचा नाही तर चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा फोटो छापून आला आहे. बिहार बंदच्या इंडिया आघाडीच्या आंदोलनावेळी या महिलेचा पती हे ओळखपत्र घेऊन मीडियासमोर आला. यामुळे निवडणूक आयोगाचे पुरते हसे झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा महिलेने ही चूक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा तिलाच गप्प बसण्यास सांगण्यात आले.
महिलेचा पती चंदन कुमार याने हा प्रकार मीडियासमोर आणला आहे. अभिलाशा कुमारी असे या महिलेचे नाव असून तिच्या फोटोच्या जागी नितीशकुमार यांचा फोटो लावण्यात आला आहे. चंदन कुमार याने मी आता अभिलाशाला पत्नी मानू की नितीशकुमारांना असा सवाल करत निवडणूक आयोगाचा हा निष्काळजीपणा असल्याचा आरोप केला आहे.
ही चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाच्या ब्लॉक लेव्हल ऑफिसरकडे गेलो तेव्हा त्यांनी उलट आम्हालाच गप्प राहण्यास सांगितले. अशा या अक्षम्य चुकीवर कारवाई करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी चंदन कुमार यांनी केली आहे.