अमरनाथ यात्रेचे हल्लेखोर काश्मीरीही नाहीत आणि मुसलमानही नाही: फारूक अब्दुल्ला
By Admin | Updated: July 11, 2017 18:24 IST2017-07-11T18:24:25+5:302017-07-11T18:24:25+5:30
दगडफेक करणारे आणि फुटीरतावाद्यांच्या समर्थनार्थ विधानं करून नेहमी चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्स पक्षाचे नेता फारूक अब्दुल्ला

अमरनाथ यात्रेचे हल्लेखोर काश्मीरीही नाहीत आणि मुसलमानही नाही: फारूक अब्दुल्ला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - दगडफेक करणारे आणि फुटीरतावाद्यांच्या समर्थनार्थ विधानं करून नेहमी चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्स पक्षाचे नेता फारूक अब्दुल्ला यांनी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. अमरनाथ यात्रेचे हल्लेखोर हे काश्मीरीही नाहीत किंवा ते मुसलमानही नाहीत तर ते समाजकंटक आहेत असं अब्दुल्ला म्हणाले.
इंडिया टुडेसोबत बोलताना अब्दुल्ला म्हणाले, अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा मोठ्या संकटांपैकी एक आहे. देशात सांप्रदायिक तणाव वाढावा हाच ज्यांनी हल्ला केला त्यांचा उद्देश होता, आम्ही शांतीप्रिय लोक आहोत, आम्हाला विकास हवाय. या हल्ल्यामागे असणा-या शक्तींना विकास रोखायचा आहे.
यावेळी बोलताना अब्दुल्ला यांनी सुरक्षा व्यवस्थेवरून केंद्र सरकारवरही टीका केली. यात्रेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती, 20 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते, तरीही हल्ला झाला. कुठे कमतरता राहिली आणि पुन्हा असा हल्ला होवू नये यासाठी काय करावं याचा केंद्र सरकारने विचार करायला हवा असंही अब्दुल्ला म्हणाले.
अमरनाथ हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा, पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल मास्टरमाईंड-
अमरनाथ यात्रेतील दहशतवादी हल्ल्यामागे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हात असून पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलीस महनिरीक्षक मुनीर खान यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिला यात्रेकरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.