अमरनाथ मंदिरात घंटानादास बंदी! एनजीटीचा निर्णय; मंत्रजागर, जयजयकारही करता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:22 IST2017-12-14T00:21:26+5:302017-12-14T00:22:18+5:30
काश्मीरमधील भगवान शंकराच्या अमरनाथ या पवित्र मंदिरात घंटानाद करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) बंदी केली आहे. तो परिसर शांतता क्षेत्र असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हा आदेश दिला आहे.

अमरनाथ मंदिरात घंटानादास बंदी! एनजीटीचा निर्णय; मंत्रजागर, जयजयकारही करता येणार नाही
नवी दिल्ली: काश्मीरमधील भगवान शंकराच्या अमरनाथ या पवित्र मंदिरात घंटानाद करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) बंदी केली आहे. तो परिसर शांतता क्षेत्र असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हा आदेश दिला आहे.
हिमालयात ३,८८ मीटर उंचीवर असलेल्या या गुंफेमध्ये येणा-या भाविकांना मंत्रघोष व जयजयकारही करू दिला जाऊ नये, असाही आदेश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने अमरनाथ मंदिर प्रशासनास दिला.
अमरनाथपर्यंत जाण्याचा डोंगर पायवाटेचा मार्ग खडतर असल्याने गर्दी आणि रेटारेटी यामुळे तेथे नेहमीच दुर्घटना होण्याची भीती असते. हे लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी अधिक सुरक्षाउपाय व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, असे न्यायाधिकरणाने याआधी सांगितले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने आता हे नवे आदेश देण्यात आले आहेत.
काश्मीरमधील वैष्णोदेवी या पवित्र तीर्थस्थानी होणाºया गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी न्यायाधिकरणाने गेल्या महिन्यात जाणाºया भाविकांच्या संख्येवर प्रतिदिन ५० हजाराची कमाल मर्यादा घातली होती.
भाविकांच्या सामानावरही निर्बंध
भाविकांनी मंदिरात जाण्यापूर्वी मोबाइल फोनसह आपले सामान शेवटच्या चेक पोस्टवर ठेवावे आणि तेथून पुढे एकेरी रांग लावून मंदिरापर्यंत जावे. शेवटच्या चेक पोस्टपाशी भाविकांचे सामान ठेवून घेण्यासाठी प्रशासनाने एखादी खोली बांधावी, असेही न्यायाधिकरणाने सांगितले आहे.