लखनौ : उत्तर प्रदेशातील तीन मंत्र्यांच्या स्वीय सचिवांच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केले असून, या तिघा सचिवांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिघा सचिवांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.ओमप्रकाश राजभोर, अर्चना पांडे व संदीप सिंग या तीन मंत्र्यांचे हे स्वीय सचिव आहेत.मोठी सरकारी कंत्राटे मिळवून देण्यासाठी त्यांनी संबंधित कंत्राटदारांकडे लाच मागितल्याचे आरोप झाले होते. खाणींचे कंत्राट, शोलय पुस्तकांचा पुरवठा व दारूच्या दुकानांचे परवाने देणे यासाठी या तिघांनी लाच मागितली होती, असे समजते. त्याचे स्टिंग आॅपरेशन एका हिंदी वृत्तवाहिनीने केले होते. ते प्रसारित होताच राज्य सरकारने या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले.मात्र या तिघा सचिवांवर कारवाई करणे पुरेसे नसून, संबंधित तिन्ही मंत्र्यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या लाच प्रकरणांत या मंत्र्यांची भूमिकाही तपासणे गरजेचे आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
यूपीतील तीन मंत्र्यांच्या सचिवांवर लाचेचे आरोप, योगींनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 06:23 IST