विवाह मंडपात मद्यपी नवरदेवाचा तमाशा, वधू बदलल्याचा केला आरोप
By Admin | Updated: March 15, 2016 12:34 IST2016-03-15T10:44:30+5:302016-03-15T12:34:26+5:30
विवाहमंडपात मद्यपान करुन आलेल्या नवरदेवाने सासू-सास-यांवर लग्नाची बायको बदलल्याचा आरोप केल्यामुळे चिडलेल्या नववधूने विवाहास नकार देत लग्न मोडले.

विवाह मंडपात मद्यपी नवरदेवाचा तमाशा, वधू बदलल्याचा केला आरोप
ऑनलाइन लोकमत
मथुरा, दि. १५ - विवाहमंडपात मद्यपान करुन आलेल्या नवरदेवाने सासू-सास-यांवर लग्नाची बायको बदलल्याचा आरोप केल्यामुळे चिडलेल्या नववधूने विवाहास नकार देत लग्न मोडले. उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील पारखान गावात १३ मार्चला ही घटना घडली.
नवरदेवाच्या या विक्षिप्त वागण्यामुळे राजस्थानच्या भारतपूर जिल्ह्यातून आलेल्या वरपक्षाला वधूशिवाय परतावे लागलेच शिवाय मुलीच्या आई-वडीलांनी लग्नासाठी केलेला सर्व खर्चही भरुन द्यावा लागला. राजस्थानच्या डीग शहरातून नवरदेव आणि त्यांचे नातेवाईक ११ मार्चला लग्नासाठी पारखान गावात आले होते. रविवारी रात्री १३ मार्चला लग्न होते.
नवरदेव आणि त्याचे नातेवाईक विवाहस्थळी पोहोचले त्यावेळी नवरदेवाने मद्यपान केले होते. विवाहाची लगबग सुरु असताना अचानक नवरदेवाने मुलींच्या कुटुंबियांवर लग्नाची बायको बदलण्याचा आरोप केला. शेवटच्या क्षणी तुम्ही मुलगी बदलली असे त्याचे म्हणणे होते. तिथे उपस्थित असलेल्या चार मुलींमधून एकीची भावी पत्नी म्हणून आपण निवड करु असा हट्ट त्याने धरला.
नवरदेवाची ही मागणी ऐकल्यानंतर वधूने विवाह न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठांनी वधूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी पंचायत बोलवण्यात आली.
वरपक्षाची चूक असल्याने पंचांनी विवाहासाठी केलेला सर्व खर्च भरुन देण्याचा आदेश दिला. वरपक्षातील दोघांना पैसे आणण्यासाठी डीग येथे पाठवले तो पर्यंत राजस्थानातून आलेल्या सर्वांना बंधक बनवून ठेवले होते.