Operation Mahadev : जम्मू काश्मीरमधील दाचीगाममध्ये २८ जुलै रोजी झालेल्या ऑपरेशन महादेवमध्ये भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. याच तीन दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून २६ निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. दरम्यान आता, हे तिन्हीही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे.
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले तिन्ही दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचा पुरावा आता सापडला आहे. हे तिघे केवळ पाकिस्तानी नागरिकच नाही तर, 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचे सदस्य देखील होते. भारतीय सुरक्षा दलाने असे अनेक पुरावे गोळा केले आहेत, जे सिद्ध करतात की हे तिघेही पाकिस्तानी नागरिक आहेत.
अनेक पुरावे आले समोर!वृत्तसंस्था एएनएआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जप्त केलेले चॉकलेट रॅपर्स, पाकिस्तानी ओळखपत्रे, सॅटेलाइट फोन लॉग आणि इतर पुरावे पहलगाम हल्लेखोरांच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांची पुष्टी करतात.
संसदेत भाषणादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २९ जुलै रोजी लोकसभेत सांगितले होते की, पहलगाम हल्लेखोरांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करणारी, सरकारने जारी केलेली पाकिस्तानी कागदपत्रे आमच्या हाती लागली आहेत.
सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा केला खात्माऑपरेशन महादेव दरम्यान, सुरक्षा दलांनी २८ जुलै रोजी तीन दहशतवाद्यांना सुलेमान शाह उर्फ फैसल जट्ट, अबू हमजा उर्फ अफगाण आणि यासिर उर्फ जिब्रान यांना ठार केले.
भारतीय एजन्सींनुसार, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि मुख्य शूटर ए++ लष्कर कमांडर सुलेमान शाह होता. हमजा आणि यासिर हे ए-ग्रेड लष्कर कमांडर होते. गोळीबारादरम्यान हमजा हा दुसरा बंदूकधारी होता, तर यासिर हा तिसरा बंदूकधारी होता, जो मागील सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होता.