भारतातील सर्व जण रामाचे पूत्रच - साध्वी निरंजन ज्योती
By Admin | Updated: December 2, 2014 15:10 IST2014-12-02T10:29:31+5:302014-12-02T15:10:06+5:30
भारतातील सर्व जण रामाचे पूत्र असून अन्य धर्मांमधील लोकं ही धर्मांतर केलेली मंडळी आहेत असे वादग्रस्त विधान भाजपा नेत्या व केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केले आहे.

भारतातील सर्व जण रामाचे पूत्रच - साध्वी निरंजन ज्योती
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारतातील सर्व जण रामाचे पूत्र असून अन्य धर्मांमधील लोकं ही धर्मांतर केलेली मंडळी आहेत असे वादग्रस्त विधान भाजपा नेत्या व केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केले आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी नरेंद्र मोदींची तुलना थेट रामाशी केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी भाजपाने दिल्लीत प्रचाराचा नारळ फोडला. सोमवारी मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभेत भाजपाने हिंदूत्ववादाची भूमिकाच मांडली. पश्चिम दिल्लीतील एका सभेत साध्वी निरंजन ज्योती यांची जीभ घसरली. विरोधकांवर टीका करताना त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. तुम्हाला रामजाद्यांचे (रामाच्या पुत्रांचे) सरकार हवे की अन्य कोणाचे असे त्यांनी सांगितले. यावरुन गदारोळ झाल्यावरही त्या थांबल्या नाहीत. प्रसारमाध्यमांशी स्पष्टीकरण देताना त्यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले. मोदींना मौत के सौदागर म्हणणा-यांनी माफी मागितली नाही. मी काहीच चुकीचे बोलले नाही असे त्यांनी सांगितले. ज्यांच्या पुजेची पद्धत वेगळी असते त्यांनी धर्मांतर केलेले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, साध्वी निरांजन ज्योती यांच्या विधानावरुन संसदेत गदारोळ माजला. पंतप्रधान मोदींनीही सार्वजनिक ठिकाणी सांभाळून बोला अशी तंबीच स्वपक्षाच्या खासदारांना दिली आहे. माझ्या विधानातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते असे त्यांनी संसदेसमोर सांगितले.