मेडिकलचे सर्व प्रवेश यापुढे फक्त ‘नीट’नेच
By Admin | Updated: August 9, 2016 04:35 IST2016-08-09T04:35:39+5:302016-08-09T04:35:39+5:30
वर्ष २०१७-१८ या आगामी शैक्षणिक वर्षापासून देशातील आंग्लवैद्यक आणि दंतवैद्यक या विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश देशपातळीवर घेतल्या

मेडिकलचे सर्व प्रवेश यापुढे फक्त ‘नीट’नेच
नवी दिल्ली : वर्ष २०१७-१८ या आगामी शैक्षणिक वर्षापासून देशातील आंग्लवैद्यक आणि दंतवैद्यक या विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या एकाच सामायिक प्रवेश परीक्षेने दिले जाणार आहेत.
यासाठी संसदेने ‘इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट’ आणि ‘डेन्टिस्ट््स अॅक्ट’ या दोन कायद्यांमध्ये केलेल्या दुरुस्त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे. या दुरुस्त्या लोकसभेने गेल्या महिन्यात तर राज्यसभेने १ आॅगस्ट रोजी संमत केल्या होत्या. ही परीक्षा त्यासाठी खास स्थापन केल्या जाणाऱ्या प्राधिकरणातर्फे घेतली जाईल व ती इंग्रजी व हिंदीखेरीज ठरावीक भारतीय भाषांमधून होईल. खरेतर, सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा यंदाच्या वर्षापासूनच लागू करण्याचा आदेश दिला होता. राज्यांनी विरोध केल्याने केंद्राने ‘नीट’ची सक्ती शिथिल केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)