गरज पडल्यास मायावतींशी आघाडी करेन- अखिलेश यादव
By Admin | Updated: March 9, 2017 21:29 IST2017-03-09T21:29:39+5:302017-03-09T21:29:39+5:30
उत्तर प्रदेशात एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानं राजकीय नेत्यांचीही धडधड वाढली आहे.

गरज पडल्यास मायावतींशी आघाडी करेन- अखिलेश यादव
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 9 - उत्तर प्रदेशात एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानं राजकीय नेत्यांचीही धडधड वाढली आहे. सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता हस्तगत करायची आहे. त्यासाठी अखिलेश यादव यांनी गरज पडल्यास मायावतींशी युती करणार असल्याचं निकालांच्या आधीच जाहीर करून टाकलंय. समाजवादी पक्षाला संपूर्ण बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीपेक्षा मायावतींशी हातमिळवणी करणे पसंत करेन, असं मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले आहेत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर सर्व पर्याय खुले असल्याचं जाहीर केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल 11 मार्चला लागणार आहे.
ते म्हणाले, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट यावी, अशी कोणाचीही इच्छा नाही. भाजपाच्या हातात उत्तर प्रदेशचा रिमोट जाऊ नये, यासाठी मायावतींशीही युती करायला तयार असल्याचं अखिलेश यादव म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्यापेक्षा बसपाठी युती करणं पसंत करेन, असे संकेतही अखिलेश यादव यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात शत्रू असलेले अखिलेश यादव आणि मायावती निवडणुकांनंतर सत्तेसाठी एकत्र येणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
(Exit Poll: उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी फुलणार कमळ)
मुलायम सिंहांबद्दल छेडले असता अखिलेश म्हणाले की, नेताजींना जिथे प्रचार करायचा होता, तिथे त्यांनी केला. आम्ही त्यांना याबाबत काहीच सांगितलं नाही. राहुल गांधींचीही इच्छा आहे की, यूपीचा विकास व्हावा म्हणून काँग्रेससोबत आघाडी केली आहे. मी राहुल गांधींना पूर्वीपासून ओळखतो. आम्हाला यूपीमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार हवं आहे, त्यासाठीच आम्ही काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. मी कंजूष लोकांशी मैत्री करत नसल्याचंही अखिलेश यादवांनी स्पष्ट केलं आहे.