लखनौ - समाजवादी पक्षाच्या होर्डिंगवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धा चेहरा लावून त्यावर अखिलेश यादव यांचा फोटो लावल्याने उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे. भाजपासहमायावती यांनीही अखिलेश यादव यांच्या पोस्टवर आक्षेप घेतला. योगी सरकारच्या मंत्र्यांनी हा तर बाबासाहेबांचा अपमान आहे अशी टीका केली. या प्रकरणावरून भाजपाने अखिलेश यादव यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पोस्टरवरील फोटो पाहून मायावतीही चांगल्याच भडकल्या. आपण बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतोय याची जाणीव समाजवादी पक्ष आणि काँग्रेसलाही नाही असं सांगत त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी ट्विटरवर या प्रकारावर भाष्य केले. भारतीय संविधान निर्माते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. विशेषत: समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर बसपा त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरू शकते असं त्यांनी म्हटलं.
तर समाजवादी पक्षाची मानसिकता खराब आहे. बाबासाहेबांचा जो अपमान त्यांनी केला तो देशातील जनता कधीही स्वीकारणार नाही. योग्य वेळी त्यांना भोगावे लागेल. याआधीही सपाने बाबासाहेबांचा अपमान केला आहे. अखिलेश यादव यांच्या सरकार काळात मेडिकल कॉलेजवरील आंबेडकर नाव हटवण्याचं काम त्यांनी केले. आता अशाप्रकारे पोस्टर केले जातायेत असं सांगत उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, अखिलेश यादव स्वत:ला आंबेडकर समजत आहेत परंतु त्यांना बाबासाहेबांच्या नखाची सरही नाही. बाबासाहेबांचा अर्धा फोटो आणि अखिलेश यादव यांचा अर्धा फोटो लावून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. समाजवादी पक्षाने या कृत्याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे असं भाजपा खासदार बृजवाल यांनी म्हटलं. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे हे पोस्टर लोहिया वाहिनी यांनी लावले. या फोटोत बाबासाहेबांचा अर्धा चेहरा आणि अखिलेश यादव यांचा चेहरा एकत्र केला आहे. या पोस्टरमध्ये मनोहर लोहिया, सपाचे संस्थापक मुलायन सिंह यादव, शिवपाल यादव आणि रामगोपाल यादव यांचाही फोटो लावण्यात आले आहेत.