UP मध्ये अखिलेशना सर्वाधिक पसंती, पण विधानसभा त्रिशंकू - सर्वे
By Admin | Updated: January 3, 2017 22:19 IST2017-01-03T21:36:38+5:302017-01-03T22:19:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षातील यादवीमुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत

UP मध्ये अखिलेशना सर्वाधिक पसंती, पण विधानसभा त्रिशंकू - सर्वे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असल्याने केंद्रातील सत्ताधारी भाजपसह, काँग्रेस, सप, बसपचे लक्ष लागलेल्या आणि गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षातील यादवीमुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस, लोकनीती यांनी केलेल्या संयुक्त निवडणुकपूर्व सर्वेतून ही बाब समोर आली आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेश यांनाच मतदारांची सर्वाधिक पसंती असल्याचेही दिसून येत आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या यादवीमुळे समाजवादी पक्षात फूट पडल्यास भाजप सत्तेच्या जवळ पोहोचेल. या सर्वेमुळे उत्तर प्रदेशात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर करणाऱ्या भाजपसह मायावती आणि काँग्रेसची झोप उडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून वादाचे केंद्र ठरलेल्या अखिलेश यांना या सर्वेतून दिलासा मिळाला आहे. आज जाहीर झालेल्या निवडणुकपूर्व सर्वेनुसार समाजवादी पक्षाच्या 83 टक्के मतदारांनी अखिलेश यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर राज्यातील एकूण मतदारंमधून 28 टक्के मतदारांची पसंती अखिलेश यांना आहे.
सर्वेत दाखवण्यात आलेल्या जागांच्या अंदाजानुसार समाजवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, सपला 141ते 151 जागा मिळू शकतात. तर भाजप दुसऱ्या स्थानी राहण्याची शक्यता असून, भाजपला 129 ते 139 जागा मिळू शकतात. मायावती मात्र सत्तास्पर्धेत मागे पडण्याची शक्यता आहे. त्यांना 93 ते 103 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसची अवस्था गेल्या निवडणुकीपेक्षाही खराव होण्याची शक्यता असून, त्यांना केवळ 13 ते 19 जागांवर समाधान मानावे लागू शकते, असे या सर्वेत म्हटले आहे.