पंतप्रधान मोदींच्या सहकार्याने भारत काँग्रेसमुक्त करू - अकबरुद्दीन ओवैसी
By Admin | Updated: February 4, 2016 20:06 IST2016-02-04T19:58:34+5:302016-02-04T20:06:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साथीने एमआयएम काँग्रेसला संपूर्ण देशातून साफ करून टाकेल, असे वक्तव्य एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले.

पंतप्रधान मोदींच्या सहकार्याने भारत काँग्रेसमुक्त करू - अकबरुद्दीन ओवैसी
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि, ४ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साथीने एमआयएम काँग्रेसला संपूर्ण देशातून साफ करून टाकेल, असे वक्तव्य एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूकीदरम्यान ३० जानेवारी रोजी झालेल्यया सभेत ओवैसी बोलत होते, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले असून त्यांच्या भाषणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
'नरेंद्र मोदींच्या साथीने संपूर्ण देशातून काँग्रेस साफ करून टाकेन. मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाशी एआयएमआयएमने हातमिळविणी केली तर कॉंग्रेसला भारतातून साफ करून टाकू' असे ते म्हणाले. दरम्यान काँग्रेस नेत्यांनी ओवैसींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
मात्र हे वक्तव्य करतानाच आपल्या भाषणात त्यांनी मोदींच्या ' सबका साथ सबका विकास' या घोषवाक्यावरही टीका केली. '२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केवळ एका चहावाल्याचीच भरभराट झाली' असे ते म्हणाले.