पनामा पेपर प्रकरणात अजय देवगणचे नाव
By Admin | Updated: May 4, 2016 13:47 IST2016-05-04T13:04:09+5:302016-05-04T13:47:06+5:30
पनामा पेपर लीक प्रकरणात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्यानंतर आता अभिनेता अजय देवगणचे नाव समोर आले आहे.

पनामा पेपर प्रकरणात अजय देवगणचे नाव
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - पनामा पेपर लीक प्रकरणात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्यानंतर आता अभिनेता अजय देवगणचे नाव समोर आले आहे. अजय देवगणने २०१३ मध्ये ब्रिटीश व्हर्जिन आइसलँण्डमधील मेरीलबोन एंटरटेनमेंन्ट लिमिटेड या कंपनीतील सर्व शेअर्स विकत घेतल्याचे समोर आले आहे.
हिंदी चित्रपटांचे परदेशातील हक्क मिळवण्यासाठी ही कंपनी विकत घेतल्याचे अजय देवगणने म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या संपूर्ण खरेदीच्या व्यवहारामध्ये मेरीलबोन एंटरटेनमेंटने मोझॅक फोन्सेकाची एजंट म्हणून नियुक्ती केली होती.
मेरीलबोन एंटरटेनमेंन्टचे मूळ शेअर्स लंडमध्ये रहाणा-या हसन ए सयानीच्या नावावर होते. ३१ ऑक्टोंबर २०१३ रोजी सयानीला १ हजार शेअर्स इश्यू करण्यात आले. त्याचदिवशी अजय देवगणने सयानीकडून ते सर्व शेअर्स विकत घेतले.
इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी अजय देवगणला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, परदेशात गुंतवणूक करण्यासाठी आरबीआयच्या नियमानुसार कंपनीची स्थापना केली आहे. कायद्यानुसार टॅक्स रिर्टनमध्ये माझ्या कुटुंबाने पूर्ण माहिती दिली आहे असे त्याने सांगितले.
अजय देवगणचे चार्टर्ड अकाऊंटट अनिल सेखरी यांनी सांगितले की, एम/एस न्यासा युग एंटरटेनमेंटच्यावतीने अजय देवगण यांच्याकडे मेरलीबोनचे १ हजार शेअर्स आहेत. अजय आणि त्याची पत्नी काजोल या कंपनीमध्ये भागीदार आहेत. मेरीलबोन एंटरटेनमेंटला ५० हजार शेअर्स इश्यू करण्याचा अधिकार आहे.