अजय-अतुल 'फोर्ब्स'च्या यादीत
By Admin | Updated: December 15, 2015 08:56 IST2015-12-15T08:56:16+5:302015-12-15T08:56:16+5:30
अजय-अतुल या मराठी संगीत दिग्दर्शकांच्या जोडीला 'फोर्ब्स' या जगप्रसिध्द मासिकाच्या सेलिब्रेटी यादीत दाखल होण्याचा मान मिळाला आहे.

अजय-अतुल 'फोर्ब्स'च्या यादीत
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १५ - आपल्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी रसिक मराठी प्रेक्षकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवणा-या अजय-अतुल या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी संगीत दिग्दर्शकांच्या जोडीला 'फोर्ब्स' या जगप्रसिध्द मासिकाच्या सेलिब्रेटी यादीत दाखल होण्याचा मान मिळाला आहे. फोर्ब्सने '२०१५ फोर्ब्स इंडिया १०० सेलिब्रेटी'ची यादी प्रसिध्द केली असून, त्यात अजय-अतुल जोडीला ८२ वे स्थान मिळाले आहे.
संगीताचे कोणतेही शास्त्रशुध्द प्रशिक्षण न घेता संगीत क्षेत्रात अजय-अतुल जोडीने मोठी झेप घेतल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. अजय-अतुलने मराठीबरोबर हिंदी चित्रपटातही आपला ठसा उमटवला आहे. नटरंग-जोगवा मधील अजय-अतुलची गाणी सिनेरसिकांच्या ओठांवर रुळली. शिवाय अग्निपथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या या जोडीने आमिर खानच्या सुपरहिट ठरलेल्या पीके चित्रपटातील एक गाणेही स्वरबध्द केले होते.
फोर्ब्सच्या यावेळच्या इंडिया १०० सेलिब्रेटीच्या यादीत १४ नवे चेहरे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर्मनीमधील मेक इन इंडियाच्या प्रेझेंटेशनसाठी अजय-अतुल यांनी संगीत तयार केले होते तसेच प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्राचा पुरस्कार विजेता चित्ररथ आला त्यावेळी अजय-अतुलने स्वरबध्द केलेल्या माऊली माऊली गाण्याचा गजर झाल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.