एअरबस, महिंद्रा लष्करासाठी बनविणार हेलिकॉप्टर

By Admin | Updated: July 4, 2015 02:47 IST2015-07-04T02:47:41+5:302015-07-04T02:47:41+5:30

एअरबस हेलिकॉप्टर्स आणि महिंद्रा डिफेन्स यांनी भागीदारी करून भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टर्स बनविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Airbus, helicopter to make Mahindra army | एअरबस, महिंद्रा लष्करासाठी बनविणार हेलिकॉप्टर

एअरबस, महिंद्रा लष्करासाठी बनविणार हेलिकॉप्टर

नवी दिल्ली : एअरबस हेलिकॉप्टर्स आणि महिंद्रा डिफेन्स यांनी भागीदारी करून भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टर्स बनविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारत सरकारने हाती घेतलेल्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा संयुक्त उद्यम सुरू करण्यात येणार आहे.
एअरबसने जारी केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. लष्करासाठी हेलिकॉप्टर बनविणारा हा पहिलाच खाजगी भागीदारीतला उद्यम ठरणार आहे. निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही कंपन्या आता भागीदारीविषयक उद्यमाला अंतिम स्वरूप देण्यासाठी वाटाघाटी करणार आहेत. हा उद्यम भारतीय लष्करासाठी टेहळणी आणि नौदलाच्या वापरासाठीच्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहे.
नौदलासाठी दोन प्रकारची हेलिकॉप्टर्स कंपनी बनविणार आहे. नियमित वापराचे हेलिकॉप्टर आणि बहुउपयोगी हेलिकॉप्टर असे त्यांचे प्रकार आहेत.
एअरबस हेलिकॉप्टर्सचे अध्यक्ष आणि सीईओ ग्युलायूम फॉरी यांनी म्हटले की, स्थानिक उद्योगांशी भागीदारी करून उद्योग उभारणीचा आमचा अनुभव अद्वितीय आहे. जगभरात आम्ही असे उद्योग चालवितो. भारतात आम्ही महिंद्राशी भागीदारी करीत आहोत. हा प्रकल्पही यशस्वी होईल, यात शंका नाही. या प्रकल्पाचा दोन्ही कंपन्यांनाच नव्हे, तर भारतालाही लाभ होईल.
या भागीदारीतून आम्ही हेलिकॉप्टरसाठी पूर्णत: देशी बनावटीची औद्योगिक व्यवस्था निर्माण करू इच्छितो. या संयुक्त उपक्रमातून भारतीय लष्कराला भारतातच बनविलेले हेलिकॉप्टर्स पुरविले जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)

महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स लिमिटेडच्या हवाई आणि संरक्षण विभागाचे अध्यक्ष एस.पी. शुक्ला यांनी सांगितले की, आम्हाला इंजिनिअरिंग आणि वाहन क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. हवाई उपकरणे बनविण्याच्या क्षेत्रात आमची गुंतवणूकही उत्तम आहे. एअरबस हेलिकॉप्टर्सकडे उच्च दर्जाचे रोटोक्राफ्ट प्लॅटफॉर्मचे तंत्रज्ञान आहे. याचा लाभ आमच्या उपक्रमाला होईल. दुसऱ्या पिढीतील हेलिकॉप्टर्स आम्ही बनवू. भारताची गरज त्यातून भागेलच, शिवाय निर्यातही करता येईल.

Web Title: Airbus, helicopter to make Mahindra army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.