Air Marshal AK Bharti: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ रावबत भारताने प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तानने ड्रोन, क्षेपणास्त्र डागून कुरापती करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानचा प्रत्येक वार भारताने नष्ट केला. यानंतर युद्धविराम घोषित करण्यात आला. परंतु, पाकिस्तानने त्याला केराची टोपली दाखवत काहीच तासांत पुन्हा भारताच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले केले. हेही हल्ले भारताने यशस्वीरित्या परतवून लावले. पाकिस्तानचा कुठलाच डाव भारताने यशस्वी होऊ दिला नाही. यानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलाने आज पत्रकार परिषद घेत ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सविस्तर माहिती दिली.
या पत्रकार परिषदेत एअर मार्शल एके भारती यांना भारताने केलेल्या कारवाईत पाक सैन्याची किती जीवितहानी झाली, किती दहशतवादी मारले गेले, अशा आशयाचा प्रश्न विचारला. यावर काहीशा स्पष्ट भाषेत एअर मार्शल एके भारती यांनी उत्तर दिले. आमचे काम केवळ दिलेल्या टार्गेटचा लक्ष्यभेद करणे आहे. किती जण मारले गेले, याची मोजदाद ठेवणे नाही. या कारवाईसाठी आम्ही जी योजना आणि पद्धत अवलंबली, त्याचा शत्रू राष्ट्रावर मोठा प्रभाव पडला आहे. किती जण मारले गेले? किती जण जखमी झाले? आमचा उद्देश हा नव्हता. मात्र, जर असे काही झाले असेल, तर त्याची मोजदाद करणे त्यांचे काम आहे, असे एके भारती यांनी सडेतोडपणे सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये लक्ष्यभेद करण्यासाठी वायुसेनेने कोणती शस्त्रे वापरली?
या पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये लक्ष्यभेद करण्यासाठी वायुसेनेने कोणती शस्त्रे वापरली, असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना एके भारती म्हणाले की, या कारवाईत आम्ही कोणती शस्त्रे वापरली, याबाबत कुठेही काही सांगितले नाही. दुसरीकडे, डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, ७ मे रोजी ओळख पटवण्यात आलेल्या ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. तसेच त्यांनी सांगितले की भारताने केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य झाले. तसेच ऑपरेशन सिंदूरमुळे झालेला परिणाम जगासमोर स्पष्ट आहे. दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य झाले का? आपण असे विचारलं तर याचे उत्तर हो असे आहे, तसेच त्याचे परिणाम जगासमोर आहेत, असेही एके भारती यांनी नमूद केले.