एअर इंडियामागची पीडा काही संपताना दिसत नाही. या कंपनीच्या विमानांमध्ये सातत्याने, काही ना काही समस्या येतच आहेत. दरम्यान, आता दिल्लीहून रायपूरला पोहोचलेल्या एका एअर इंडियाच्या विमानाचे दरवाजेच लवकर उघडले नाही. यामुळे प्रवासी तासभर विमानातच अडकून राहिले, असे वृत्त आहे.
रायपूरमधील स्वामी विवेकानंद विमानतळावरील घटना -खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र, विमानतळावर उतरल्यानंतरही विमानाचा दरवाजाच उघडला नाही, यामुळे प्रवासी जवळपास तासभर विमानातच अडकून होते. यानंतर, प्रवाशांना कसेतरी बाहेर काढण्यात आले.
तांत्रिक बिघाड अन् प्रवासी अस्वस्थ -सांगण्यात येते की, बराच वेळ दरवाजा न उघडल्याने एअरलाइन कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाडाची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी रात्री ११ वाजेपर्यंत विमानातच अडून होते. यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरणही दिसून आले. बिलासपूर जिल्ह्यातील कोटा मतदारसंघातील काँग्रेस आमदार अटल श्रीवास्तवही या सर्व प्रवाशांसोबत विमानात होते.
...म्हणून प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली - पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरुवातीला केबिन क्रूने यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. एका प्रवाशाने सांगितले की, काही वेळ कुठल्याच प्रकारचे संभाषण झाले नाही. गेल्या काही दिवसांत झालेल्या विमान घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. महत्वाचे म्हणजे,या प्रकरणासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.