एअर इंडियाने वाचविले रुग्णाचे प्राण!

By Admin | Updated: June 6, 2015 01:34 IST2015-06-06T01:34:11+5:302015-06-06T01:34:11+5:30

विमानाने स्पंदन करणारे हृदय सोबत घेऊन १९ मिनिटे आधी मदुराईहून उड्डाण केल्यानंतर वेळेच्या आत चेन्नईला पोहोचून एका रुग्णाला जीवनदान दिले.

Air India saved the patient's life! | एअर इंडियाने वाचविले रुग्णाचे प्राण!

एअर इंडियाने वाचविले रुग्णाचे प्राण!

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या मदुराई- चेन्नई- मुंबई (एआय ६७२) या विमानाने स्पंदन करणारे हृदय सोबत घेऊन १९ मिनिटे आधी मदुराईहून उड्डाण केल्यानंतर वेळेच्या आत चेन्नईला पोहोचून एका रुग्णाला जीवनदान दिले.
त्याचे असे झाले की, पुणे येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कार्डियोमायोपॅथी या हृदयाच्या गंभीर आजारामुळे तीन आठवड्यांपूर्वी चेन्नईच्या मीनाक्षी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर तातडीने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले होते. अशातच गेल्या बुधवारी मदुराई येथे २९ वर्षीय इसमाचा कार अपघातात मृत्यू झाला. या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मृताचे हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विविध रुग्णालयांना फोन व अन्य माध्यमाद्वारे अवयव उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले. चेन्नईच्या रुग्णालयालाही ही वार्ता कळली आणि रुग्णालयाने वेळ न दवडता मृत व्यक्तीचे हृदय आणण्याचा निर्णय घेऊन डॉक्टरांचे एक पथक मदुराईला विमानाने रवाना केले.
या पथकाने नंतर एअर इंडियाशी संपर्क साधला आणि दान मिळालेले हृदय शक्य तितक्या लवकर मदुराईहून चेन्नईला आणणे शक्य आहे का, याची विचारणा केली. यावेळी एअर इंडियाचे मदुराई- चेन्नई- मुंबई हे विमान (एआय ६७२) उड्डाणासाठी सज्ज होते. त्यामुळे एअर इंडियाने मदुराईतील डॉक्टरांचे पथक तयार झाल्याबरोबर चेन्नईला उड्डाण करण्यास आपण तयार असल्याचे कळविले. एका शरीरातून हृदय काढल्यानंतर ते पुढच्या चार तासांत दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करावे लागते.
चेन्नई विमानतळावर पोलिसांचे सहकार्य लाभल्याने हृदय अवघ्या दहा मिनिटांत रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात डॉक्टर तयारच होते. त्यांनी जराही वेळ न दवडता आवश्यक प्राथमिक चाचण्या पूर्ण केल्या. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वेळेच्या आत पूर्ण झाली. कार्डियोमायोपॅथीने ग्रस्त असलेल्या पुण्याच्या रुग्णाला नवे हृदय मिळाले आणि त्याचा पुनर्जन्म झाला. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळते. मदुराईत कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे मूत्रपिंड मदुराईतीलच अन्य दोन गरजू रुग्णांना देण्यात आले, तर त्याचे यकृत चेन्नईतील एका रुग्णालयात पाठविण्यात आले. (वृत्तसंस्था)

च्‘आम्ही निर्धारित वेळेच्या आधी सर्व प्रवाशांना विमानात बसविले. डॉक्टरांचे पथक मृत व्यक्तीच्या हृदयासह विमानतळावर दाखल झाल्याबरोबर त्यांना तत्काळ विमानात नेण्यात आले. नंतर विमानाने १८ मिनिटांपूर्वीच मदुराईहून चेन्नईला उड्डाण केले,’ अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर हे विमान आपल्या निर्धारित वेळेच्या १९ मिनिटांआधीच चेन्नईत पोहोचले.
च् विमान उतरल्यानंतर चेन्नईच्या वाहतूक पोलिसांच्या सहकार्यामुळे जिवंत हृदयाचा विमानतळ ते रुग्णालय असा प्रवास सुरू झाला.

Web Title: Air India saved the patient's life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.