नवी दिल्ली - एअर इंडिया मागचे समस्यांचे ग्रहण संपण्याची चिन्हे नाहीत. मागील आठवड्यात अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झाले. त्यानंतर सतत एअर इंडिया विमान सेवेबाबत काही ना काही बातम्या पुढे येत आहे. कधी फ्लाईटचे इमरजेन्सी लँडिंग करण्यात आले, तर कधी विमानाचा मार्ग बदलावा लागतो. कधी विलंबाने उड्डाण होतात तर कधी फ्लाईट रद्द करण्याची वेळ येते. एअर इंडियाच्या या कारभाराचा सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होतोच परंतु आता याचा फटका खासदारांनाही बसला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर जाहीर नाराजी व्यक्त केली.
एअर इंडियाच्या सेवेवर खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या. फ्लाईट उड्डाणाला होत असलेल्या विलंबावरून सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाच्या प्रशासनाला फटकारले. सुळे म्हणाल्या की, एअर इंडियाकडून प्रवाशांना योग्य माहिती दिली जात नाही. ना त्यांची मदत केली जाते असं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंच्या आधी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही एअर इंडियाच्या सेवेचा फटका बसला आहे. एका युजरने एअर इंडिया कंपनीच्या नावातून इंडिया शब्द हटवण्याची मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे या दिल्ली-पुणे एअर इंडिया फ्लाईटने प्रवास करणार होत्या. परंतु त्यांच्या फ्लाईटला तब्बल ३ तास उशीर झाला. एअरलाईन्स प्रशासनाने फ्लाईटच्या विलंबाची योग्य माहिती दिली नाही. ना त्यांच्याकडून काही मदत मिळाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. सुळे यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही माहिती देत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडे या प्रकारावर कारवाईची मागणी केली आहे. त्याशिवाय टाटाच्या अधिकृत हँडलला टॅग करत प्रवाशांना उत्तम सुविधा द्या असंही म्हटलं आहे.
एअर इंडियानं सांगितले कारण...
सुप्रिया सुळे यांच्या पोस्टवर केंद्रीय मंत्री नायडू यांनी संबंधित एअरलाईन आणि एअरपोर्ट अधिकाऱ्यांसोबत बोलल्याचे सांगत प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्याच्या सूचना दिल्या. सोबत एअर इंडिया कंपनीनेही यावर प्रतिक्रिया दिली. दिल्लीत खराब वातावरणामुळे अनेक विमानांच्या उड्डाणावर परिणाम झाला आहे. काही फ्लाईट हवेतच चक्कर मारत आहेत. आमची टीम प्रवाशांना मदत करत आहे. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं एअर इंडियाने सुप्रिया सुळे यांना म्हटलं.