अहमदाबाद - गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे. या अपघातात २४१ प्रवाशी मरण पावलेत तर सुदैवाने एकमेव प्रवासी बचावला आहे. एअर इंडिया विमानाने टेकऑफ घेताच काही मिनिटांतच ही दुर्घटना झाली. या भयंकर अपघातात विमानातील प्रवाशांसोबतच ज्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले तिथले काही निवासी डॉक्टरही मृत्युमुखी पडलेत. या विमान अपघातात पायल खाटीक नावाच्या मुलीचाही जीव गेला आहे.
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
मूळचे राजस्थानचे असलेले पायलचे कुटुंब गेल्या काही काळापासून गुजरातच्या हिंमतनगर भागात राहत होते. पायल एका खासगी कंपनीत काम करायची आणि कंपनीकडून तिला लंडनला पाठवले जात होते. पायलचा हा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे ती खूप उत्सुक होती. मात्र तिचा हाच प्रवास अखेरचा ठरला आहे. पायलचे वडील सुरेश खाटीक हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी संघर्षात मुलीला शिकवले. मात्र तीच अचानक त्यांच्या आयुष्यातून निघून गेली आहे. पायलच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबाला धक्का बसला.
पायलच्या विमान अपघाताची बातमी कळताच आईने हंबरडा फोडला तर वडील सुरेश खाटीकही धाय मोकलून रडत होते. जाण्यापूर्वी पायलने वडिलांशी संवाद साधला होता. पप्पा, काळजी करू नका, मी सांभाळून जाईन, पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये बसलीय परंतु सर्व ठीक असेल असं ती म्हणाली होती. पायल खटीक ही विमानात पहिल्यांदाच बसली होती, त्यामुळे तिला विमानतळावर सोडण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य गेले होते. पायलनेही फ्लाईटमध्ये बसल्यावर व्हिडिओ कॉल केला होता. परंतु जेव्हा विमान दुर्घटना कळली तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीन हादरली.
उड्डाण घेतल्यानंतर अचानक विमान नियंत्रणाबाहेर गेले
प्रत्यक्षदर्शीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अचानक नियंत्रण गमावले आणि अहमदाबादच्या मेघानीनगर भागात बीजे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या मेस इमारतीला धडकले. ही टक्कर इतकी भयंकर होती की विमान इमारतीला आदळताच मोठा स्फोट झाला आणि चारीबाजूने आग लागली. घटनास्थळावर काळा धूर आकाशात पसरला होता. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहचल्या. एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी आली. या दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आणि अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना टाटा समुहाकडून १ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे.