प्रामाणिकपणासाठी एअर इंडियाने कर्मचा-याला दिले प्रमोशन
By Admin | Updated: August 16, 2016 14:28 IST2016-08-16T14:28:23+5:302016-08-16T14:28:23+5:30
एअर इंडियाने वैमानिकावर कठोर कारवाई केल्याची घटना ताजी असताना त्याच एअर इंडियाने प्रामाणिपणासाठी एका कर्मचा-याला प्रमोशन दिले आहे.

प्रामाणिकपणासाठी एअर इंडियाने कर्मचा-याला दिले प्रमोशन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - मद्यपान करुन विमानात बसल्याबद्दल एअर इंडियाने वैमानिकावर कठोर कारवाई केल्याची घटना ताजी असताना त्याच एअर इंडियाने प्रामाणिपणासाठी एका कर्मचा-याला प्रमोशन दिले आहे. एअर इंडियाच्या इतिहासात प्रथमच प्रामाणिकपणासाठी एका कर्मचा-याला प्रमोशन देण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या सुरक्षा विभागात नोकरी करणा-या सुभाष चंदर यांना सुरक्षा कर्मचारी पदारुन रॅंक ऑफीसरपदावर बढती देण्यात आली आहे. इतर कर्मचा-यांसमोर आपल्या कामातून आदर्श निर्माण केल्याबद्दल सुभाष चंदर यांना ही बढती देण्यात आल्याचे एअर इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वानी लोहानी यांनी सांगितले.
विज्ञान शाखेचे पदवीधर असणा-या सुभाष चंदर यांनी अनेकवेळा प्रवाशांचे विमानात राहिलेल्या मौल्यवान वस्तू परत केल्या आहेत. अनेकदा प्रवाशांना या वस्तू परत केल्यानंतर आपण वस्तू विसरल्याचे त्यांच्या लक्षात येते. यावर्षी जून महिन्यात हॉंगकॉंगवरुन आलेल्या विमानाची तपासणी करत असताना चंदर यांना एक पिशवी सापडली. ज्यामध्ये परदेशी चलनातील पाच लाख रुपये होते. चंदर यांनी ही सर्व रक्कम त्या प्रवाशाला परत केली. सुभाष चंदर मागच्या २९ वर्षांपासून एअर इंडियाच्या सेवेत आहेत.