पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप निवळलेला नाही. भारतीय सैन्य कधीही आक्रमण करू शकतं, या भीतीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. तर भारतीय संरक्षण दलांकडूनही संभाव्य घडामोडी विचारात घेऊन, चोख तयारी केली जात आहे. दरम्यान, आज भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनीउत्तर प्रदेशमधील गंगा एक्स्पेस वेवर असलेल्या धावपट्टीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या शक्तिप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मिराज, राफेट, सुखोई आणि जग्वार विमानांच्या गर्जनेने आसमंत दणाणून गेला होता.
हवाई दलाकडून सध्या गंगा एक्स्प्रेस वेवर असलेल्या ३.५ किमी लांबीच्या धावपट्टीवर उतरण्याचा आणि उड्डाण करण्याचा सराव सुरू आहे. गंगा एक्स्प्रेस वे हा विमानांच्या उड्डाणाची आणि उतरण्याची सोय असलेला उत्तर प्रदेशमधील चौथा एक्स्प्रेस वे आहे. तसेच रात्रीच्या वेळीही विमानांना उतरता येईल अशी सुविधा असलेला हा देशातील पहिला एक्स्प्रेस वे आहे.
दरम्यान, शाहजहांपूरमधील गंगा एक्सप्रेसवर पीरू गावाजवळ साडे ३ किमी लांब धावपट्टी बनवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही धावपट्टी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण चीन सीमेपासून २५० किमी अंतरावर ही धावपट्टी आहे. येथे नाईट लँडिंगची विशेष व्यवस्था उभारण्यात आली आहे.