विमानात उकळते पाणी अंगावर पडून वृद्धा भाजली
By Admin | Updated: August 28, 2014 02:33 IST2014-08-28T02:33:09+5:302014-08-28T02:33:09+5:30
घरातील एका लग्न समारंभासाठी दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या एका कुटुंबातील ६२ वर्षांची महिला प्रवासी अंगावर उकळते पाणी सांडून भाजल्याची घटना स्पाईसजेट कंपनीच्या विमानात अलीकडेच घडली

विमानात उकळते पाणी अंगावर पडून वृद्धा भाजली
नवी दिल्ली: घरातील एका लग्न समारंभासाठी दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या एका कुटुंबातील ६२ वर्षांची महिला प्रवासी अंगावर उकळते पाणी सांडून भाजल्याची घटना स्पाईसजेट कंपनीच्या विमानात अलीकडेच घडली. संतापजनक गोष्ट अशी की ‘बजेट एअरलाईन’ म्हणून नको त्या बाबतीत काटकसर करून चालविल्या जाणाऱ्या या विमानात साधी प्रथमोपचाराची सोय नाही, अंगावर सांडलेले पाणी पुसण्यासाठी टॉवेल किंवा नॅपकिन नाही व विमान कर्मचाऱ्यांना अशा वेळी काय करावे याचे कोणतेही प्रशिक्षण नाही या बाबी यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आल्या.
रितु सिंग या दिल्लीतील तरुणीने १३ आॅगस्ट रोजी स्पाईसजेटच्या दिल्ली-हैदराबाद या मार्गावरील दुपारच्या विमानात आपल्या आईच्या बाबतीत घडलेल्या या घटनेची माहिती दिली. रितु सिंग यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई विमानात मार्गिकेशेजारच्या आसनावर बसली होती. यशस्वी उड्डाणानंतर विमान हवेत बऱ्यापैकी उंचीवर गेल्यावर कुणाल नावाचा एक विमान कर्मचारी (प्लाईट स्टेवर्ट) प्रवाशांना ग्रीन टी देण्यासाठी आला. तोल जाऊन त्याच्या हातातील उकळत्या पाण्याची किटली रितुच्या आईचा हात तसेच पाठ आणि आसनाचा मागे टेकण्याचा भाग यामध्ये उलटी झाली. पाणी पाठीवरून ओघळून कंबरेपर्यंत पोहोचले.
हात, पाठ व कंबर चांगलीच पोळून निघाली व मोठे फोड आले. आधीच उच्च रक्तदाब, संधीवात व कोलेस्ट्रोलचा त्रास असलेली रितुची आई असह्य वेदनांनी किंचाळू लागली. काही क्षणांसाठी तिची शुद्धही हरपली. रितु सिंग यांनी पुढे सांगितले की, आणखी वाईट म्हणजे विमान कर्मचारी कुणाल एका पेपरकपमध्ये बर्फ घेऊन आला व पोळलेल्या भागांवर त्याने एवढ्या जोराने बर्फ चोळण्यास सुरुवात केली की त्या वेदनांनी रितुची आई आणखी विव्हळू लागली. रितुच्या कुटुंबियांनी सांडलेले पाणी पुसण्यासाठी टॉवेल किंवा कापडी नॅपकिन देण्याची विनंती केली. पण यापैकी काहीही विमानात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मागूनही तक्रार-पुस्तक दिले गेले नाही व विमानात घडलेल्या घटनेची तक्रार कंपनीच्या वेबसाईटवर फक्त आॅनलाईनच करता येईल, असे सांगितले गेले, अशीही तक्रार त्यांनी केली.
अजूनही औषधोपचार सुरु रितु सिंग यांनी असेही सांगितले की, या घटनेला १५ दिवस झाले तरी अजूनही माझ्या आईची अॅन्टीबायोटिक औषधे सुरु आहेत. आई अथरुणावर खिळून राहिल्याने लग्न समारंभाच्या आनंदावर विरजण पडले. दिल्लीला परतल्यापासून खूप ताप भरल्याने आईने पुन्हा अंथरूण धरले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)