Ahmedabad Plane Crash: 12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघाताची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशी मागणी करत विमानाचे दिवंगत पायलट सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 91 वर्षीय पुष्कर राज सबरवाल यांनी न्यायालयात सांगितले की, 'तांत्रिक बिघाडांकडे दुर्लक्ष करुन संपूर्ण दोष पायलटवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय.
सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि DGCA ला नोटीस
यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तुमच्या मुलाचा दोष आहे, असे तुम्ही समजू नका. कोणीही तुमच्या मुलाला दोष देऊ शकत नाही. भारतात कोणीही असे मानत नाही की, ही पायलटची चूक होती. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर केंद्र सरकार आणि नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांना नोटीस बजावली आणि उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला होणार असून, ही याचिका आधीपासून प्रलंबित असलेल्या दुसऱ्या जनहित याचिकेसोबत ऐकली जाईल.
चौकशी अहवालाचे काही भाग प्रसिद्ध केल्याने नाराजी
यापूर्वी 22 सप्टेंबरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालातील निवडक भाग माध्यमात प्रसिद्ध करून पायलटवर दोषारोप लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कोर्टाने म्हटले होते की, चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळे गोपनीयता राखणे अत्यावश्यक आहे. काही विदेशी माध्यमांनी दावा केला की, तपास अहवालात कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरवरील संभाषणाचा उल्लेख आहे. त्यात एक पायलट विचारतो, “फ्युएल का कट-ऑफ केले?” त्यावर दुसरा पायलट म्हणतो, “मी केले नाही.” या संभाषणाचा चुकीचा अर्थ लावून पायलट्सना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सबरवाल कुटुंबाचे म्हणणे आहे.
विमान अपघातात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू
हा भीषण अपघात 12 जून 2025 रोजी झाला होता. अहमदाबादहून लंडनला निघालेले एअर इंडिया चे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. हे विमान मेघाणी नगर परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेसवर आदळले. या दुर्घटनेत पायलट, क्रू मेंबर्स आणि प्रवासी मिळून 241 लोकांचा मृत्यू झाला, तर फक्त एक प्रवासी जिवंत बचावला. याशिवाय, विमान ज्या इमारतीवर कोसळले, त्या कॉलेजमधील 19 जणांचा मृत्यू झाला होता.
Web Summary : Pilot's father petitions Supreme Court for impartial Air India crash probe, alleging pilot blamed for technical fault. Court seeks response from government, DGCA.
Web Summary : पायलट के पिता ने सुप्रीम कोर्ट में एयर इंडिया विमान दुर्घटना की निष्पक्ष जांच की याचिका दायर की, तकनीकी खराबी के लिए पायलट को दोषी ठहराने का आरोप लगाया। कोर्ट ने सरकार, डीजीसीए से जवाब मांगा।