गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नेमका कसा झाला. त्यासाठी कोणती चूक कारणीभूत ठरली याचा तपास सुरू असून, त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या विमानाच्या वैमानिकांकडून झालेली चूक या अपघातास कारणीभूत ठरली असावी, असा दावा काही वृत्तांमधून एका अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. दरम्यान, या विमान अपघाताचा तपास करत असलेल्या भारतीय विमान अपघात तपास संस्थेने (एएआयबी) एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून काही दुजोरा न मिळालेल्या अहवालांच्या माध्यमातून काढण्यात येत असलेल्या निष्कर्षांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्राथमिक तपासाचा उद्देश केवळ अपघातावेळी काय घडलं हे सांगण्याचा आहे. त्याआधारावर कुठला निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कारण तपास असून पूर्ण झालेला नाही, असे या संस्थेने स्पष्ट केले आहे.
एएआयबीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील काही निवडक वर्ग निवडक आणि कुठलाही आधार नसलेल्या अहवालांच्या आधारावर अपघाताबाबत निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत आहे. तपास सुरू असताना असे दावे करणे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे.
अशा प्रकारे बेजबाबदार वार्तांकन केल्यामुळे केवळ तपास प्रक्रियाच धोक्यात येत नाही तर त्यामुळे दुर्घटनेत जीव गमावणारे प्रवासी, कर्मचारी आणि इतर व्यक्तींच्या भानवाही दुखावल्या जातात. प्राथमिक अहवालाचा उद्देश हा केवळ त्यावेळी काय घडलं हे सांगण्याचा आहे. त्यावरून कुठलाही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही एएआयबीने स्पष्ट केले.