काँग्रेसला मजबूत करण्यामध्ये अहमद पटेल यांचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 04:22 AM2020-11-26T04:22:07+5:302020-11-26T04:22:35+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी; राष्ट्रपती, सोनिया गांधींकडून श्रद्धांजली अर्पण

Ahmed Patel played a major role in strengthening the Congress | काँग्रेसला मजबूत करण्यामध्ये अहमद पटेल यांचा मोठा वाटा

काँग्रेसला मजबूत करण्यामध्ये अहमद पटेल यांचा मोठा वाटा

Next

n लोकमत न्यूज नेटवर्क
नवी  दिल्ली : काँग्रेसला मजबूत करण्यामध्ये अहमद पटेल यांचा मोठा वाटा होता. ही त्यांची कामगिरी सर्वांच्या नेहमीच लक्षात राहिल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांसह अनेक मान्यवर नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अहमद पटेल हे अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे नेते होते असेही नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, अहमद पटेल यांच्यामध्ये रणनीतीकार व  जनाधार असलेले नेते अशा दोन्ही गुणांचे मिश्रण होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, अतिशय मृदू 
स्वभावाचे असलेल्या अहमद पटेल यांनी असंख्य माणसे जोडली होती. राजकीय वर्तुळात त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. सगळ्याच पक्षांच्या नेत्यांशी अहमद पटेल यांचे उत्तम संबंध होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर, राजनाथसिंह, स्मृती इराणी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आदी मान्यवरांनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पक्ष कार्याला वाहून घेतले होते -सोनिया गांधी
आयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या कार्याला वाहून घेतलेले अहमद पटेल यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. ते माझे अतिशय विश्वासू सहकारी होते. प्रामाणिकपणा, कामाविषयी असलेली समर्पण वृत्ती, नेहमी मदत करण्यासाठी तत्पर असणे हे दुर्मीळ गुण त्यांच्याकडे होते.     -सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष

गरिबांच्या कल्याणासाठी कार्यरत -मनमोहनसिंग
काँग्रेसच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक असलेले अहमद पटेल हे गरीब व तळागाळातल्या लोकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले.
     -मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान

निकटस्थ मित्र गमावला - विजय दर्डा
मी स्तब्ध झालो आहे. मी निकटस्थ मित्र गमावला आहे.  दिल्ली भेटीत आम्ही दोघांनी एकत्र बसून देश आणि प्रदेशाच्या राजकारणावर चर्चा केली नाही, असे कधी घडले नाही. अहमदभाई यांचे व्यक्तिमत्त्व असे होते की, ते सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये लोकप्रिय होते. ते शब्दांचे धनी होते. जे बोलले ते पूर्ण करण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करीत होते. त्यांची राजकीय जाण अनोखी होती. गांधी कुटुंबासोबत असलेली त्यांची जवळीक लपून राहिली नव्हती. जेव्हा जेव्हा पक्षासमोर मोठे संकट उभे ठाकले त्यावेळी त्यांनी मोठ्या कौशल्याने ते सोडवले. त्यामुळेच सोनिया गांधी त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेत राहिल्या. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अहमदभाई यांच्या जाण्याने काँग्रेसला झालेल्या नुकसानीची हानी भरून निघणे शक्य नाही. माझ्याप्रती त्यांना वाटणारी विशेष जवळीक शब्दांमध्ये व्यक्त करणे शक्य नाही.
-विजय दर्डा, माजी खासदार आणि चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड

 

Web Title: Ahmed Patel played a major role in strengthening the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.