अघोरी अंधश्रद्धा, जिवंत जाळून मृतदेहाभोवती केला नाच
By Admin | Updated: August 28, 2014 14:02 IST2014-08-28T11:53:20+5:302014-08-28T14:02:12+5:30
काळी जादू करणा-या सहा जणांनी एका व्यक्तीला जिवंत जाळून त्याच्याभोवती नृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अघोरी अंधश्रद्धा, जिवंत जाळून मृतदेहाभोवती केला नाच
>ऑनलाइन लोकमत
खांडवा, दि. २८ - मध्यप्रदेशमधील खांडवा जिल्ह्यात अंधश्रद्धेची परिसीमा गाठणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. काळी जादू करणा-या सहा जणांनी एका व्यक्तीला जिवंत जाळून त्याच्याभोवती नृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा सर्व क्रूरप्रकार मयत व्यक्तीच्या दहा वर्षाच्या मुलाच्या डोळ्यादेखतच घडत होता.
डिंडोरी जिल्ह्यात राहणारे ब्रिजलाल त्यांच्या दहा वर्षांच्या मुलावर उपचार करण्यासाठी खांडवा येथील पार्वती या महिलेकडे गेले होते. पार्वती ही काळी जादू करुन लोकांवर उपचार करण्याचा दावा करते. या अंधश्रद्धेला बळी पडून ब्रिजलाल, त्यांचा मुलगा व पत्नी हे तिघे पार्वतीच्या आश्रमात गेले. आश्रमात पार्वतीने तिच्या अनुयायांना ब्रिजलालची हत्या करण्यास सांगितले. यानंतर चार महिला व दोन पुरुषांनी मिळून ब्रिजलालची हत्या केली. आधी ब्रिजलाल यांच्यावर त्रिशूलने वार करण्यात आले. यानंतर निर्घूणपणे कु-हाडीने त्यांचे हात कापण्यात आले. एवढ्यावरही न थांबता या क्रूरकर्मांनी ब्रिजलाल यांना जिवंत जाळले व त्यांच्या मृतदेहाची राख होईपर्यंत सर्व जण ब्रिजलाल यांच्या भोवती रिंगण करुन नाचत होते. हा सर्व प्रकार ब्रिजलालची पत्नी व मुलाच्या डोळ्यादेखतच घडला. 'या घटनेची बाहेर वाच्यता केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील' अशी धमकीही ब्रिजलाल यांच्या पत्नीला देण्यात आली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ब्रिजलाल यांची पत्नी व मुलाने आश्रमातून पळ काढला व काळ्याकुट्ट अंधारातून पायपीट करत स्थानिक पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी पार्वती व तिच्या सहा अनुयायांना अटक केली आहे.