उद्धव गोडसेकोल्हापूर : इटालियन लग्झरी फॅशन ब्रँड प्राडाने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलचे सादरीकरण केले होते. मात्र, ते कोल्हापुरी असल्याचा उल्लेख टाळल्याने वादाला तोंड फुटले. गेल्या दोन आठवड्यांपासून याची देश-विदेशात चर्चा सुरू आहे. टीकेची झोड उठताच प्राडानेही ते चप्पल कोल्हापुरीच्या प्रेरणेतून तयार केल्याची कबुली दिल्याने मूळ कोल्हापुरी ब्रँडवर शिक्कामोर्तब झाले. या घडामोडींचा फायदा कोल्हापुरी चप्पलला होत असून, गेल्या दोन आठवड्यांत ऑनलाइन मागणी आणि चौकशीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सुमारे १३ व्या शतकापासून वापरात असलेल्या कोल्हापुरी चप्पलला जीआय मानांकन मिळाले असून, २०१९ मध्ये पेटंटही मिळाले आहे. टिकाऊ, आकर्षक आणि आरोग्यदायी गुणवैशिष्ट्यांमुळे कोल्हापुरी चपलांचा वापर केला जातो. अलीकडे काही सेलिब्रिटींकडून आवर्जून कोल्हापुरीचा वापर होत असल्याने याची क्रेझ वाढली आहे. महिला आणि पुरुषांसाठी विविध प्रकारच्या चपला उपलब्ध असल्याने फॅशन जगतातही याची चलती आहे.प्राडाच्या फॅशन शोमध्ये याचा वापर होताच ते जगभरातील फॅशन जगतात झळकले. त्याच्या किमतीपासून ते उपयुक्ततेपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चेला सुरुवात झाली. यातूनच त्याचे मूळ कोल्हापुरी असल्याचे स्पष्ट झाले. चर्चेला वादाचा सूर येताच प्राडानेही माघार घेत कोल्हापुरी ब्रँडवर शिक्कामोर्तब केले.देश-विदेशातील प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली. यातून कोल्हापुरी चप्पलबद्दल कुतूहल वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन आठवड्यांत ऑनलाइन विक्रेत्यांकडे मागणी वाढली असून, चौकशीसाठी फोन येत आहेत. वेबसाइट, पोर्टल, व्हॉट्सॲप ग्रुपवरूनही चौकशी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. विशेष म्हणजे पावसाळ्यामुळे सध्या कोल्हापुरी चप्पल विक्रीचा हंगाम नसतानाही चौकशी आणि मागणी सुरू असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
प्राडाच्या वादानंतर देश-विदेशातून चौकशी आणि मागणीचे मेल, मेसेज, फोन येत आहेत. व्यवसाय वाढीसाठी हे चांगले संकेत आहेत. शासनाने पुढाकार घेतल्यास जगभरातील बाजारपेठेत कोल्हापुरीला स्थान मिळेल. - अभिषेक व्यवहारे - ऑनलाइन विक्रेते, कोल्हापूर