लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिला आठवडा गोंधळात सरल्यानंतर आता आज, सोमवारपासून पुन्हा कामकाज सुरू होत असून, पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूर हे मुद्दे पुन्हा तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरणावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने असतील.
गेल्या आठवड्यातील विरोधकांची आक्रमकता, सत्ताधाऱ्यांनी त्यांना दिलेले प्रत्युत्तराचा अनुभव पाहता दोन्ही बाजूंनी या आठवड्यात ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथसिंह व परराष्ट्र मंत्री या मुद्द्यांवर सरकारची बाजू मांडतील.
हे चर्चेच्या मैदानात
सत्ताधाऱ्यांच्या वतीने अनुराग ठाकूर, सुधांशू त्रिवेदी आणि निशिकांत दुबे यांच्यासारख्या मंत्र्यांसह ३० हून अधिक देशांचा दौरा करून परतलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळातील नेते चर्चेत उतरतील. यात श्रीकांत शिंदे, जदयूचे संजय झा आणि तेलुगू देसमचे हरिश बालयोगींचा समावेश असेल.