गजेंद्रच्या आत्महत्येनंतर भाषण सुरू ठेवून चूक केली - केजरीवाल
By Admin | Updated: April 24, 2015 14:12 IST2015-04-24T10:13:27+5:302015-04-24T14:12:51+5:30
किसान रॅलीदरम्यान शेतकरी गजेंद्र सिंगच्या आत्महत्येनंतर आपण आपले भाषण थांबवायला हवे होते असे सांगत आपली चूक झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केले.

गजेंद्रच्या आत्महत्येनंतर भाषण सुरू ठेवून चूक केली - केजरीवाल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - किसान रॅलीदरम्यान शेतकरी गजेंद्र सिंगच्या आत्महत्येनंतर आपण आपले भाषण थांबवायला हवे होते असे सांगत आपली चूक झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केले. या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी आपण व आापला पक्ष तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गजेंद्रने गलफास लावून आयुष्य संपवल्यानंतरही मचावरून अरविंद केजरीवाल व इतर नेत्यांची भाषणं सुरू होती. त्यावरून गदारोळ माजलेला असतानाच आज केजरीवालांनी अखेर आपली चूक कबूल करत माफी मागितली. 'व्यासपीठापासून ते झाड अगदी जवळ होते, मात्र तेथे बॅनर्स लावलेले असल्याने तेथे काय सुरू आहे ते आम्हाला दिसत नव्हते. झाडाजवळ काहीतरी गडबड सुरू असल्याचे आम्हाला जाणवल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. त्यावेळी तेथे काही स्वयंसेवक आणि पोलिसही उपस्थि होते पण गजेंद्र सिंग खरंच आत्महत्या करेल असे कोणालाच वाटले नव्हते. मला मान्य आहे की आत्महत्येच्या घटनेनंतर मी बोलणे थांबवायला हवे होते, मी तसे केले नाही ही चूक झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण आता आपण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक करण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या का करत आहे यावर चर्चा करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मीडियावरही टीकास्त्र सोडले. फक्त टीआरपी मिळवण्यासाठी त्या शेतक-याच्या आत्महत्येच्या घटनेची चित्र दाखवली जात आहेत, त्याविषयी चर्चा केली जात आहे, हे योग्य नव्हे अशी टीका त्यांनी केली. तसेच ही घटना माझ्या डोळ्यासमोरच घडली असून त्यादिवशी रात्रभर झोपू शकलो नसल्याचेही केजरीवाल पुढे म्हणाले.
दरम्यान असे वक्तव्य करत केजरीवाल राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला आहे.