कॉम्रेड पानसरेंच्या निधनाने नागपूर हळहळले
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:13+5:302015-02-21T00:50:13+5:30
सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते दु:खी आणि संतप्त

कॉम्रेड पानसरेंच्या निधनाने नागपूर हळहळले
स माजिक चळवळीतील कार्यकर्ते दु:खी आणि संतप्तनागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनाची बातमी रात्री उशिरा नागपुरात येऊन धडकली. या दु:खद वार्तेने सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली. कॉम्रेड पानसरे यांचे नागपूर आणि विदर्भातील सामाजिक चळवळीशी घनिष्ट नाते राहिले आहे. त्यांचे चळवळीच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते. सोमवारी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताग्रस्त होते. शुक्रवारी रात्री त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर शहरातील विविध क्षेत्रातील नामवंत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते शोकाकुल झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे म्हणाले की, धर्मांध शक्तीविरुद्ध लढताना भविष्यात कोणकोणती आव्हाने उभी राहणार आहेत, याचे कटू संकेत या घटनेतून मिळाले आहेत. एका वृद्ध, नि:शस्त्र कार्यकर्त्यावर करण्यात आलेला हल्ला पुरोगामी महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे म्हणाले की, सामाजिक चळवळीतील निर्भीड कार्यकर्त्यांचा आवाज बंद करण्याचा हा नराधम मार्ग आहे. कॉम्रेड पानसरेंनी महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळींना बळ दिले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरीश अड्याळकर यांना ही दु:खद वार्ता कळल्यावर ते शोकाकूल झाले. धर्मांध शक्ती विरुद्ध ज्यांनी आवाज उठविला त्यांना या देशात हौतात्म्य पत्करावे लागले आहे, महात्मा गांधी, डॉ. नरेंद्र दाभोळकर असो की कॉम्रेड गोविंद पानसरे, भविष्यात महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्र येऊन धर्मांध शक्ती विरुद्ध लढा देण्याची आवश्यकता आहे.