अपघातानंतर एसटी चालक-वाहकाला बेदम मारहाण
By Admin | Updated: July 6, 2015 23:51 IST2015-07-06T23:51:24+5:302015-07-06T23:51:24+5:30
- रत्नागिरीजवळील घटना : निषेधार्थ बसफेर्या बंद केल्याने वाहतूक ठप्प

अपघातानंतर एसटी चालक-वाहकाला बेदम मारहाण
- त्नागिरीजवळील घटना : निषेधार्थ बसफेर्या बंद केल्याने वाहतूक ठप्परत्नागिरी : तालुक्यातील साखरतर येथे एका वृद्धाच्या पायावरून एसटी बसचे चाक गेल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने बसचालक आणि महिला वाहकाला बेदम मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ एसटी चालक-वाहकांनी बसफेर्या बंद केल्याने तब्बल सात तास शहरी आणि सहा तास ग्रामीण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यात असंख्य प्रवाशांचे विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले.कासारवेली येथे सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात जैनुद्दीन शिरगावकर (६५) हे जखमी झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या साखरतर ग्रामस्थांनी बसचालक सचिन सावंत आणि वाहक मयूरी सुर्वे यांना बेदम मारहाण केली. जोपर्यंत जखमीवर उपचार होत नाहीत, तोपर्यंत चालक-वाहक आणि बस जागची हलू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तोपर्यंत घटनास्थळी पोहोचलेल्या एसटी अधिकार्यांनी शिरगावकर यांना शासकीय रुग्णालयात आणले. उपचार सुरू झाल्यानंतर बस अपघातस्थळावरून सोडण्यात आली.या मारहाणीचे वृत्त तत्काळ रत्नागिरी एसटी आगारापर्यंत आले. त्यामुळे चालक-वाहक एकत्र झाले आणि त्यांनी शहरी बस वाहतूक बंद केली. सकाळी दहा वाजल्यापासून ही वाहतूक ठप्प झाली. पाठोपाठ अकरा वाजता ग्रामीण फेर्याही बंद करण्यात आला. चालक-वाहकाला मारहाण करणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा, अशी मागणी करीत सर्वच चालक-वाहकांनी चक्काजाम केला. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत चालक-वाहकांची समजूत काढली. चर्चेच्या तीन फेर्यांनंतर सायंकाळी पाच वाजता वाहतूक पूर्ववत सुरू झाली. (प्रतिनिधी)