तब्बल १६ वर्षांनंतर आधार कार्डमुळे वृद्ध माता-पुत्राचे मीलन
By Admin | Updated: November 13, 2014 09:47 IST2014-11-13T09:45:59+5:302014-11-13T09:47:03+5:30
केरळच्या व्ही. ही. मोहन या कैद्याचे केवळ आधार कार्डमुळे तब्बल १६ वर्षांनंतर केरळमधील ८0 वर्षीय वृद्ध मातेशी मीलन होण्याची सुखद घटना घडली आहे.

तब्बल १६ वर्षांनंतर आधार कार्डमुळे वृद्ध माता-पुत्राचे मीलन
पणजी : खून प्रकरणात आग्वाद कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या केरळच्या व्ही. ही. मोहन या कैद्याचे केवळ आधार कार्डमुळे तब्बल १६ वर्षांनंतर केरळमधील ८0 वर्षीय वृद्ध मातेशी मीलन होण्याची सुखद घटना घडली आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्ताप्रमाणे केरळात श्रीमूलंगरम गावातून मोहन हा नोकरीच्या शोधात गोव्यात आला होता. बांबोळी येथे फर्निचर तयार करणार्या आस्थापनात सुतार म्हणून तो कामाला लागला; परंतु तेथे कार्नाटकी मालकाबरोबर काही करणाने त्याचा वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने मालकाचा खून केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याला जन्मठेप ठोठावली.
केरळहून मोहन याच्या गावातून आलेल्या काही बांधवांसह अब्राहम यांनी कारागृहात मोहन याची भेट घेऊन क्षेमकुशल विचारले आणि मातेबद्दल सांगितले. माउली तुझी वाट पाहात आहे, असा निरोपही दिला.
मोहन याची वृद्ध माता कल्याणी ही श्रीमूलंगरम गावात अत्यंत मोडकळीस आलेल्या घरात एकटीच राहते. १६ वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने गोव्यात आलेला मोहन याची डोळ्यात तेल घालून ही माय वाट पाहात एक ना एक दिवस तो परतणार या आशेवर जगत होती. पती तसेच दोन मुलांच्या निधनानंतर ही वृद्धा घरात एकटीच राहात होती. वयोमानाप्रमाणे दृष्टिदोषामुळे तिला नीट दिसतही नाही; परंतु मुलगा परत येईल, ही आशा तिने सोडली नाही.
नेहमी ती देवाकडे प्रार्थना करायची, बहुधा देवानेही ती ऐकली असावी. काही आठवड्यांपूर्वी तिच्या हातात टपालाने आलेला एक लिफाफा पडला. लिहिता, वाचता येत नसल्याने तो घेऊन ती स्थानिक सरपंचाकडे गेली. सरपंचाने तो फोडला असता त्यात मोहन याचे आधार कार्ड होते. तिच्याकडे मोहनचा फोटोही नव्हता. आधार कार्डचा आधार घेऊन त्यांनी मोहन याचा शोध सुरू केला. गावातील लोकांनी पणजी केरळ समाजाकडे चौकशी केली असता मोहन खून प्रकरणात १३ वर्षे कारागृहात असल्याचे उघड झाले.
(प्रतिनिधी)
कारागृहाचे अधिकारीही थक्क
मोहन याच्या गावची मंडळी दाखल झाल्यावर आग्वाद कारागृहाचे अधिकारीही थक्क झाले. १३ वर्षांत त्याची साधी विचारपूस करण्यासाठीही कोणी आले नव्हते किंवा मोहन याने स्वत: कोणत्याही सणासाठी किंवा कार्यासाठी पेरोलवर सुटका मागितली नव्हती. आता या अधिकार्यांनी त्याच्या मातेविषयी काही कागदपत्रे मागितली असून त्याला निदान काही दिवसांसाठी गावात न्यावे आणि माता-पुत्राचे मीलन करावे यासाठी त्याची पेरोलवर सुटका करण्यासाठी आता प्रयत्न चालले आहेत.