वकिलांचे आज लाक्षणिक काम बंद आंदोलन
By Admin | Updated: August 30, 2014 00:48 IST2014-08-29T23:32:49+5:302014-08-30T00:48:22+5:30
- मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची मागणी

वकिलांचे आज लाक्षणिक काम बंद आंदोलन
- मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची मागणी
कोल्हापूर : मंुबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी शनिवारी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील लाक्षणिक काम बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे न्यायालयातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम सर्र्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, अशी येथील वकील व पक्षकारांची मागणी आहे. यासाठी खंडपीठ कृती समिती नेमण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी या प्रश्नाबाबत नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीतील एक सदस्य न्या. रणजित मोरे यांची कृती समितीच्या सदस्यांनी भेट घेतली. यावेळी मोरे यांंनी सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव होणे आवश्यक, तसेच राज्य शासनाने पुन्हा अन्य ठिकाणी खंडपीठाची मागणी करु नये, अशा तरतुदीचा लेखी ठराव करण्याची मागणी करावी, असे सांगितले. उच्च न्यायालयाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ खंडपीठ कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
याचाच एक भाग म्हणून उद्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकील या लाक्षणिक काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील सुमारे ५६२ न्यायालयांतील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)