संसदीय बोर्डातून आडवाणींना वगळले
By Admin | Updated: August 26, 2014 17:08 IST2014-08-26T15:46:46+5:302014-08-26T17:08:01+5:30
भारतीय जनता पार्टीचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना आता अखेर पक्षाच्या संसदीय मंडळातून म्हणजेच पार्लमेंटरी बोर्डातून वगळण्यात आले आहे

संसदीय बोर्डातून आडवाणींना वगळले
>नवी दिल्ली, दि. २६ - भारतीय जनता पार्टीचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना आता अखेर पक्षाच्या संसदीय मंडळातून म्हणजेच पार्लमेंटरी बोर्डातून वगळण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर अमित शाह यांनी घेतलेला हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असून आता पक्षाची सगळी सूत्रे तरूण तुर्कांच्या हातात आली आहेत, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या हातात पक्षाची संपूर्ण सूत्रे आल्याचे दिसत आहे. आडवाणी व जोशी यांच्या जागी शिवराज सिंह चौहान व जे. पी. नड्डा यांना संसदीय मंडळामध्ये घेण्यात आले आहे.
आडवाणींसह मुरली मनोहर जोशी यांनाही संसदीय मंडळातून वगळण्यात आले असून नवीन मार्गदर्शक मंडळ तयार करण्यात आले असून त्यामध्ये मोदी, आडवाणी व जोशी यांचा समावेश आहे. या मार्गदर्शक मंडळाचे निश्चित काय कार्य असेल हे सांगण्यात आले नसून कदाचित आडवाणी व जोशींची समजूत याप्रकारे घालण्याचा प्रकार असावा अशी शक्यता आहे.
आता पक्षाचे सगळ्यात महत्त्वाचे निर्णय घेणा-या संसदीय मंडळामध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, अरूण जेटली, शिवराज सिंह चौहान, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, नितिन गडकरी, जे. पी. नड्डा, थावरचंद गेहलोत, रामलाल, अनंतकुमार आदींचा समावेश आहे.