अदनान सामीला 'न्यु ईयर गिफ्ट', १ जानेवारीपासून मिळणार भारतीय नागरिकत्व
By Admin | Updated: December 31, 2015 15:14 IST2015-12-31T15:09:23+5:302015-12-31T15:14:23+5:30
गेल्या १५ वर्षांपासून भारतात राहणारा व पाकिस्तानी नागरिकत्वाचा त्याग करणारा गायक अदनान सामी याला १ जानेवारी २०१६ पासून भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

अदनान सामीला 'न्यु ईयर गिफ्ट', १ जानेवारीपासून मिळणार भारतीय नागरिकत्व
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - गेल्या १५ वर्षांपासून भारतात राहणारा व पाकिस्तानी नागरिकत्वाचा त्याग करणारा गायक अदनान सामी याला उद्यापासून म्हणजेच १ जानेवारी २०१६ पासून भारतीय नागरिकत्व मिळणार असून त्याच्यासाठी हे 'न्यु ईयर' गिफ्टच म्हणावे लागेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने या निर्णयाची घोषणा केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर एरवी पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना तीव्र विरोध करत आंदोलन करणारी शिवसेना यावर काय भूमिका घेते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यातच अदनानला अनिश्चित कालावधीसाठी भारतात राहण्याची परवानगी दिली होती. २००१ साली एका वर्षाच्या व्हिसासह भारतात आलेल्या अदनाने वेळोवेळी व्हिसाचे नूतनीकरण केले होते. मात्र त्याच्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी अधिका-यांनी त्याच्या नूतनीकरणास नकार दिला. त्यानंतर अदनानने गेल्या मे महिन्यात गृहमंत्रालयातील अधिका-यांची भेट घेऊन आपल्याला पाकिस्तानमध्ये पाठवले जाऊ नये अशी मागणी केली. मानवतावादी भूमिकेतून त्याची ही मागणी मान्य झाली होती. कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची सोय आहे. त्यानुसार त्याला भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यात आले आहे.