ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - प्राप्तिकर विभागानं बँक खातेधारकांना अकाऊंटला आधार कार्डशी जोडण्याचं आवाहन केलं आहे. तसं न केल्यास तुमचं बँक खातं बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे 30 एप्रिलआधी तुमची केवायसी डिटेल आणि आधार कार्ड नंबर बँकेत जमा करण्याची सूचना प्राप्तिकर विभागानं केली आहे. तुम्ही जर ही माहिती 30 एप्रिलच्या आधी बँकेत जमा न केल्यास विदेशी कर अनुपालन कायद्यांतर्गत तुमचं अकाऊंट बंद करण्यात येणार आहे. जर एखाद्या प्रकरणात बँक खातेधारक दिलेल्या मुदतीत बँकेत स्वतःसंदर्भातील माहिती जमा करू शकले नाहीत, त्यांचं खातं गोठवण्यात येणार आहे. ज्या खातेधारकांनी 1 जुलै 2014 ते 31 ऑगस्ट 2015 दरम्यान बँक खाती उघडली आहेत, अशा खातेधारकांनाही केवायसी देणे गरजेचे आहे. विदेशी कर अनुपालन कायद्याच्या करारावर भारत आणि अमेरिकेनं स्वाक्षरी केली होती. जुलै 2015 नंतर विदेशी कर अनुपालन कायद्यांतर्गत भारत आणि अमेरिका करासंदर्भातील माहितीची देवाणघेवाणही करू शकतात. त्यानुसार जे खातेधारक 30 एप्रिल 2017पर्यंत स्वतःसंदर्भात माहिती बँकेकडे उपलब्ध करणार नाहीत, त्यांची खाती गोठवण्यात येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी कर परतावा भरताना नावातील पहिल्या अक्षरामुळे पॅन कार्ड आधार कार्डशी जोडताना अडचण निर्माण झाली होती. के. व्यंकटेश यांना त्यांच्या नावातील "के" या अक्षरामुळे कर परतावा भरताना समस्या निर्माण झाल्या होत्या. कारण त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी जुळत नाही. बँकेत काम करणा-या के. व्यंकटेश यांनी आपल्या अकाऊन्टंटला संपर्क साधल्यानंतर त्यांचा हा प्रकार लक्षात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदी सरकारनं सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले असतानाच सर्वोच्च न्यायालयानं केंद्राच्या या निर्णयावर ताशेरे ओढले होते. सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकार आधार कार्ड सक्तीचे करू शकत नसल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र बँक अकाऊंट उघडणे किंवा प्राप्तिकर भरण्यासाठी सरकार आधार कार्ड मागू शकते, असंही सुनावणीत म्हटलं होतं.
30 एप्रिलपर्यंत बँक खातं आधारला जोडा, अन्यथा...
By admin | Updated: April 12, 2017 13:46 IST