आंदोलनकर्ते 'हिंदू-विरोधी' - FTIIच्या वादात संघाची उडी
By Admin | Updated: July 18, 2015 13:09 IST2015-07-18T11:37:44+5:302015-07-18T13:09:34+5:30
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उडी घेत 'आंदोलनकर्ते हिंदूविरोधी' असल्याचा आरोप केला आहे.

आंदोलनकर्ते 'हिंदू-विरोधी' - FTIIच्या वादात संघाची उडी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - एफटीआयआयच्या ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उडी घेतली असून 'आंदोलनकर्ते विद्यार्थी हे हिंदूविरोधी आहेत' असा आरोप संघाचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मध्ये करण्यात आला आहे. ' तसेच हे आंदोलन म्हणजे एक नियोजित कट अाहे' असेही लेखात म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे निकटवर्तीय मानले जाणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांची एफटीआयआच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला असून त्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यातच बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवल्याने हा वाद आणखीनच चिघळला आहे. मात्र आता संघाने या वादात उडी घेत आंदोलनकर्त्यांना थेट 'हिंदूविरोधी' ठरवल्याने या वादात आणखी ठिणगी पडली आहे.
'एफटीआयआय वाद : आंदोलन की कट ?
- सरकारने गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यावर लगेच हिंदू-विरोध तत्वांना पुढे करण्यात आले. एफटीआयआयच्या तथाकथित हितचिंतकांना या आंदोलनामुळे काहीही फरक पडलेला नाही, कारण त्यांना संस्था व विद्यार्थ्यांच्या भल्याशी घेणं-देणं नसून हिंदू-विचारांविरोधात अपप्रचार करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.
- महाभारतातील 'युधिष्ठिरा'च्या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेल्या गजेंद्र चौहान यांच्याकडे अध्यक्षपदासाठी कोणतीही कमतरता नाही. ३४ वर्षांचा अनुभव असलेल्या चौहान यांनी १५० चित्रपट व अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे ते अकार्यक्षम असल्याचा मुद्दा म्हणजे केवळ कांगावा आहे. जे आंदोलन करत आहेत, त्यांच्यापेक्षा चौहान यांची कुवत नक्कीच अधिक आहे. मानसिक संतुलन बिघडलेले लोकच (कुवतीविषयी) प्रश्न उपस्थित करू शकतात.
- 'पीके'सारख्या चित्रपटांद्वारे हिंदूंची चुकीची प्रतिमा लोकांसमोर ठेवणारे राजकुमार हिरांनीसारखे काही निर्माते चौहान यांचा विरोध करण्यात सर्वात पुढे आहेत. यापूर्वी एफटीआयआयचे अध्यक्ष असलेले यू. आर. अनंतमूर्ती यांनी आयुष्यात कधीही अभिनय केला नाही. तसेच चौहानांना विरोध करणा-या मृणाल सेन या मार्क्सवादी असून गिरीश कर्नाड हिंदूद्वेष्टे असल्याचे जगप्रसिद्ध आहे. तर श्याम बेनेगल भाजपाविरोधी विचारांसाठीच ओळखले जातात.