दंगलीतील आरोपी आमदारास झेड सुरक्षा
By Admin | Updated: August 27, 2014 00:48 IST2014-08-27T00:48:56+5:302014-08-27T00:48:56+5:30
मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आणि उत्तर प्रदेशच्या सरधना मतदारसंघाचे भाजपा आमदार संगीत सोम यांना झेड सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे़

दंगलीतील आरोपी आमदारास झेड सुरक्षा
लखनौ : मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आणि उत्तर प्रदेशच्या सरधना मतदारसंघाचे भाजपा आमदार संगीत सोम यांना झेड सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे़ सोम यांच्या जीवाला धोका असल्याची सूचना गुप्तचर विभागाने दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सोम यांना झेड सुरक्षा कवच पुरविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्षांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे़ याउलट भाजपाने सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे़ गुप्तचर विभागांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारावर सोम यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात काहीही गैर नसल्याचे भाजपाने म्हटले आहे़
उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक (कायदा व्यवस्था) अमरेंद्र सिंह सेंगर यांनी आज मंगळवारी सोम यांना झेड श्रेणीची सुरक्षा पुरविण्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला़ ते म्हणाले की, आम्हाला केंद्र सरकारकडून पत्र मिळाले आहे़
यात भाजपा आमदार संगीत सोम यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ हे पत्र संबंधित सुरक्षा संस्थेकडे पाठविण्यात आले आहे़ गतवर्षी सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये ६० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर ९० जण जखमी झाले होते़ सोम यांच्यावर सोशल नेटवर्किंग साईटवर प्रक्षोभक व्हिडिओ अपलोड करणे तसेच विखारी भाषण देण्याचा आरोप आहे़ (वृत्तसंस्था)