उरण - उरण-भाऊचा धक्का सागरी मार्गावर शुक्रवारी रात्रीच्या वेळी नौदलाची स्पीड बोट प्रवासी लाँचला धडकली. या अपघातात १० प्रवासी सुदैवाने बचावल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
उरण-मोरा बंदरातून रात्री आठ वाजता शेवटची संत ज्ञानेश्वर लाँच १० प्रवाशांना घेऊन भाऊचा धक्काकडे निघाली हाेती. नौदलाच्या बीकन जेट्टीसमोर आल्यानंतर जेएनपीए बंदराकडून वेगाने येणाऱ्या नौदलाची स्पीड बोट ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होती. वेगात असलेल्या स्पीडबोट चालकाला लाँचमधील सारंग, चालक, खलाशी, प्रवाशांनी आरडाओरडा करीत सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट लाँचला धडकली. दरम्यान, खबरदारीची उपाययोजना म्हणून अपघातग्रस्त संत ज्ञानेश्वर लाँच प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. तपासणीनंतरच लाँचला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली जाणार असल्याची माहिती भाऊचा धक्का येथील बंदर निरीक्षक सुशील साटेलकर यांनी दिली. या प्रकरणी प्रवाशांनी यलो गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
‘त्या’ दुर्घटनेच्या आठवणींना उजाळाया अपघाताने डिसेंबरमधील दुर्घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटादरम्यान नौदलाच्या स्पीड बोट व निलकमल बाेटीचा भर समुद्रात अपघात झाला होता. यात १४ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.