‘मुदतबाह्य सिलिंडरमुळे होतात अपघात’
By Admin | Updated: March 18, 2015 01:46 IST2015-03-18T01:46:21+5:302015-03-18T01:46:21+5:30
सिलिंडरमधून गॅस गळती होते व त्यामुळे स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहक अजाणतेपणे त्याचा वापर करतात व जिवितहानी होते.

‘मुदतबाह्य सिलिंडरमुळे होतात अपघात’
नवी दिल्ली : मुदतबाह्य घरगुती गॅस सिलिंडरच्या वापरामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अपघात घडत असून, या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर तेल कंपन्यांनी लक्ष घालण्याचा विषय ‘विशेष उल्लेखाव्दारे’खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत उपस्थित केला.
खा. विजय दर्डा म्हणाले, मुदत गेलेल्या गॅस सिलंडरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे मनुष्यहानी होत आहे. या सिलिंडरमधून गॅस गळती होते व त्यामुळे स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहक अजाणतेपणे त्याचा वापर करतात व जिवितहानी होते. मुदतबाह्य सिलिंडरची तपासणी करून ते वापरातून बाद करावे, अशा सूचना तेल कंपन्यांना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र वेगवेगळÞ्या एजन्सींचे नियम त्यांच्यानुसार बदलत असल्याचे दिसून आले. काही एजन्सी स्वत:च तपासणी करतात तर काही अन्य कंपन्यांकडून करून घेतात. मात्र योग्य तो परिणाम होत नसल्याचे आढळून आल्याने मोठे अपघात घडत आहेत. सिलिंडरमध्ये गॅस कमी असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येऊनही त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते,असे सांगून खा. दर्डा यांनी असे अपघात रोखावे यासाठी तेल कंपन्यांना मुदतबाह्य सिलिंडर ग्राहकांना दिले जाणार नाहीत तसेच गॅसच्या वजनाबाबत ग्राहकांना जागरूक करण्यात कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना सरकारने द्याव्या,असे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)